प्रेक्षकांना चॉईस राहिलाय का?

प्रेक्षकांना चॉईस राहिलाय का?

Published by :
Published on

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अलिकडेच प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणं बंद करा, असा मौल्यवान (आम्हा प्रेक्षकांसाठी) सल्ला दिला. गेल्या काही वर्षात वाहिन्यांच्या वाढत्या संख्येमुळे मालिकांचा दर्जा घसरत चालला आहे, हे मान्य करावेच लागेल… याचे कारण चांगल्या संहितांवर काम करायचे असेल तर त्यामागे वाहिन्यांच्या गोतावळ्यात त्यांचे-त्यांचे चालणारे राजकारण हे चांगल्या नवोदितांसाठी जीवघेणं असतं… त्यात आता ओटीटी नामक एक व्यासापीठ सुरू झाल्यामुळे त्यावर अनेक स्वतंत्र चॅनेल्स सुरू झालेली आहेत. प्रेक्षकांसाठी वेगवेगळे पर्याय या निमित्ताने उपलब्ध झाले आहेत… मात्र, त्यांच्यावर कोणतेही बंधन नसल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली चाललेला अतिरेक हा आपल्या परंपरा आणि संस्कृतीला मारक ठरत चालला आहे. काही मालिका हिंसा, व्यभिचार आणि अंगप्रदर्शन याभोवतीच फिरताना दिसतात, या मालिका ओटीटीवर सर्रास दाखवल्या जात आहेत… त्यांचा प्रेक्षकवर्गही वाढत चाललाय… त्यामुळे वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या अनेक मालिकांची लोकप्रियता कमी झाली आणि प्रेक्षक ओटीटीवरील मालिकांकडे वळले… साहजिकच त्यामुळे वाहिन्यांवरील मालिकाची पसंती मागे पडत गेलीय… ही पसंती मिळवण्यासाठी वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयोग राबवले जात असले तरी त्यात नाविण्याची कमतरता भासू लागली… नव्या क्रांतीमुळे मनोरंजन क्षेत्रात विविध पर्याय निर्माण झालेत. जे उत्तम होते, त्यांना चांगला पर्याय मिळाल्याने त्यांनी तो निवडला…आता जो गाळ राहिला आहे. त्यावर काही वाहिन्यांच्या मालिका सुरू आहेत. आत्ताच्या मालिकांचे कथानक हे एकतर हिंदीच्या कथानकावरून घेतलेले असते, वा जुन्या कथानकांनाच नवा साज देवून पुन्हा त्यात-त्याच मालिका प्रेक्षकांवर थोपवल्या जात आहेत. या मालिका न पाहणे हे नक्कीच प्रेक्षकांच्या हाती आहे. तसे केल्यास त्यांचा प्रेक्षकवर्ग कमी होईल आणि त्यांना त्याचा आर्थिक फटका बसेल… आणि तो बसायलाच हवा… मात्र, तसे होत नाही.. कारण मराठी प्रेक्षक हा कलेवर प्रेम करणारा आहे… मायबाप प्रेक्षकांना उत्तमोत्तमची जाण असली तरी अनेकदा त्याच्या माथी काहीही मारलं जात आहे… याबाबत कलाकार, दिग्दर्शक वा निर्मात्यांना काही प्रश्न उपस्थित केल्यास ते त्यांच्या 'सो कॉल्ड' अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करतात… मुळात आता सुरू असलेल्या काही वाहिन्यांवरील मालिकांच्या कथानकांचा विचार केल्यास एखाद्या वाहिनींवर 'आई' या व्यक्तिरेखेवर मालिका सुरू झाली तर लागलीच तशा मालिका अन्य वाहिन्यांनावर सुरू होतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, त्या-त्या वाहिनीची टिआरपी ठरवणारी टिम… त्यांना लगेच असं वाटतं की एखाद्या वाहिनीवरील अमुक विषयाची मालिका हिट ठरली तर लागलीच स्वतःच्या वाहिनीवर तशी मालिका असावी, असा त्यांचा आग्रह असतो. मात्र तो प्रत्यक्षात येत नाही. याला कारणही तसंच असतं, ते म्हणजे केवळ दुसऱ्यांनी तो विषय लावून धरला म्हणून तोच विषय घेणे, पहिल्या मालिकेचा ट्रॅक ज्या पात्रांभोवती फिरेल तसाच ट्रॅक दुसऱ्या मालिकेत घेणे… त्यामुळे मूळ संहितेतील मूळ कथानक कुठल्या कुठे गायब झालेला असतो. त्यामुळेच ती मालिका दिशाहिन होत जाते… मग त्याला लग्न सोहळे, सणवार आणि त्या-त्या वेळेला येणाऱ्या दिनविशेषांसोबत जोडले जातात. ज्यांचा कथानकाच्या मूळ विषयाशी काहीही देणं-घेणं नसतं. वाहिन्यांकडून हे सर्व एकतर्फी होत असल्यानं त्यात प्रेक्षकांच्या मताला अजिबात किंमत नसते… नाटक वा सिनेमा ही माध्यमं अशी आहेत की, मायबाप प्रेक्षकांना एखादी कालाकृती आवडली नाही तर ते त्याकडे सपशेल पाठ फिरवतात. पहिल्या आठवड्यातील पहिल्या तीन दिवसात तुफान चाललेला चित्रपट आठवड्याच्या शेवटी स्क्रिनवरून खाली उतरलेला आहे, अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेक नाटके पहिल्या पाच प्रयोगानंतर प्रेक्षकाभावी बंद झाली आहेत. वाहिन्यांवर थेट तसा परिणाम होताना दिसत नाही. कारण त्या-त्या मालिकेची लोकप्रियता वास्तवात कमी झाली असली तर टिआरपी नामक गोष्ट संपूर्ण वाहिनीची लोकप्रियता ठरवत असल्यानं त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं… म्हणूनच दर्जाहिन मालिकांकडे प्रेक्षकांनी दुर्लक्ष केलं तरी त्यांच्यावर त्या थोपवल्याच जातात… काही कलाकार संवेदनशील आहेत. ते अशा कोणत्याही कलाकृतीत कामच करत नाहीत. ते नक्कीच कौतुकास्पद आहे… मात्र गेल्या काही वर्षात हाताशी काम नाही म्हणून कोणतीही तद्दन मालिका चांगल्या कलाकारानं स्वीकारली आहे, अशीही उदाहरणे आहेत.. असो, मूळ मुद्दा होता तो दर्जाहिन मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवण्याची गरज आहे… मुळात अशा दर्जाहिन मालिका तयार होणार नाहीत, याचेच जास्त प्रयत्न होण्याची गरज आहे… आपले मराठी साहित्य अजरामर आणि दर्जेदार आहे. मराठी साहित्यातील कलाकृतींचा जगभरात डंका गाजत आहे. अनेक भाषांमध्ये आपल्या मराठी साहित्याचे अनुवाद झाले आहेत… तरीही आपल्याकडे दर्जाहीन मालिका तयार व्हाव्यात ही आपल्या सर्वांसाठीच नामुष्की ठरेल.

-नरेंद्र कोठेकर,संपादक, लोकशाही न्यूज

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com