Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi

पत्रकार ते राजकारणी होण्यापर्यंतचा संजय राऊतांचा राजकीय प्रवास

शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावरच्या माहितीनुसार संजय राऊत शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत.

शिवसेना(ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत हे शिवसेना फुटण्याआधीपासून तर फुटल्यानंतर शिवसेनेचे धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्याच संजय राऊत यांचा आज 63 वा वाढदिवस आहे. ते कायम आपल्या विधानाने आणि आपल्या धारधार लेखणीने विरोधकांना घाम फोडतात. त्याच संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवनप्रवास राजकारणात कसा होता हे जाणून घेऊया.

संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावरच्या माहितीनुसार संजय राऊत शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे.

संजय राऊत यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही पत्रकारितेपासून झाली. सुरुवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. त्यानंतर राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. क्राईम रिपोर्टर म्हणूनही संजय राऊत यांनी स्वत:चे वेगळं स्थान निर्माण केलं. या काळात त्यांनी अनेक सनसनाटी बातम्यांचं वृत्तांकन केलं. यावेळी त्यांनी अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमहाली दम दिल्याचं राऊतांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे. सच्चाई नावाचं सदर ते लोकप्रभा साप्ताहिकात लिहित होते.

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनी संजय राऊत यांच्या एकूण प्रवासाबद्दल सांगितलं होतं, "पहिल्यांदा राऊत हे 'लोकप्रभा' या साप्ताहिकात काम करायचे. तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत. तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले."

"संजय राऊत एक उत्तम पत्रकार आहेत. क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास खूप कमी लोकांनी केला आहे. राजकीय पत्रकार ते संपादक असा प्रवास केलेले अनेक संपादक आहेत. पण क्राईम रिपोर्टींगपासून सुरूवात करणारे खूप कमी पत्रकार संपादक झालेले आहेत. सध्या ते कुठेही असले तरी तिथून ते अग्रलेख पाठवत असतात. सामनाची ताकद त्यांच्या मथळ्यांमध्ये आहे. ते कसे असावेत याची शैली त्यांनी ठरवून ठेवली आहे.

पुढे 2004 ला ते राज्यसभा खासदार झाले. ते आजतागायत ते राज्यसभा सदस्य आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यातही त्यांचा महत्वपूर्ण वाटा राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तिन्ही पिढ्यांसोबत जुळवून घ्यायचे कौशल्य संजय राऊत यांनी आत्मसात केले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तो काळ शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. त्यावेळी सेनेची भूमिका राऊतांनी अतिशय परखडपणे मांडली.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com