नवाब मलिकांमुळे कोणाची कोंडी?
सुनील शेडोळकर
विधानसभेच्या 6 अधिवेशनात गैरहजर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्री राहिलेले नवाब मलिक कालपासून नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहिले. नवाब मलिक अधिवेशनात आल्यापेक्षा ते कुठे बसले यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत दिवसभर कलगीतुरा रंगला. नवाब मलिक अधिवेशनात आल्यानंतर सत्ताधारी गटासोबत बसले आणि एकच गहजब झाला. मलिक यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची कोंडी झालेली दिसून आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलिक हे भाजप सभासदांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा मुद्दा उपस्थित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले. त्यामुळे सायंकाळी या विषयाची तत्परता दाखवीत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप असल्यामुळे त्यांना महायुतीचा भाग बनविता येणार नसल्याचे म्हटले. फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर हे पत्र त्यांनी ट्विटरवर टाकले आणि त्यामुळे चर्चेला उधाण आले. विधिमंडळाच्या संसदीय कामकाजात तरबेज असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत लवंगी फटाका फोडणारे सरकारमधील मंत्री नवाब मलिकांच्या विरोधात दिवाळी नंतर मोठा बाॅम्ब फोडतो असे सांगून तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले व उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राजकीय दृष्ट्या घायाळ केलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांचे प्रकरण बाहेर काढले होते. मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात दाउद इब्राहीम ची बहीण हसिना पारकर हिची मालमत्ता नवाब मलिकांनी खरेदी केल्याचे हे प्रकरण होते. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत ईडीने त्यांना अटक केली होती. दीड वर्षांपेक्षा जास्त काळ नवाब मलिक जेलमध्ये होते. वैद्यकीय कारणांमुळे त्यांना दोनच महिन्यांपूर्वी जामीन मिळाला असून त्यानंतर काल प्रथमच नवाब मलिक सार्वजनिकरित्या दिसले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाने अचानक कुस बदलल्याने सत्तेचा विचका झाला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचे त्रैराशिक शक्य असल्याचे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी बंद दाराआड झालेल्या चर्चेत अडीच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेला देण्याचे सांगण्यात आले होते असे सांगून भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. पाच वर्षे युतीत सत्तेत सोबत घालविल्यानंतर अचानक कटुता निर्माण झाली होती.उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे फोन घेत नव्हते . शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकार बनविण्याचा घाट घातला आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले गेले. तो संपूर्ण घटनाक्रम भारतीय जनता पक्षाला न विसरता येणारा असा होता. सत्तेवर बसूनही उद्धव ठाकरे भाजपला व खास करून देवेंद्र फडणवीस यांना आपले सरकार पाडून दाखविण्याचे आव्हान देत राहिले, ज्याची कदाचित गरजच नव्हती.एकदा सत्तेवर आल्यानंतर राजकारणातील कटुता संपवता आली पाहिजे पण शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून नवाब मलिक सातत्याने भाजपला टार्गेट करण्यावर भर देत राहिले. त्याची परिणिती ही ईडीचे शुक्लकाष्ठ संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्या मागे लागण्यात झाली व दोघांनाही जेलमध्ये टाकण्यात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून नवाब मलिक त्यावेळी पक्षाची भूमिका मांडत होते, पण राजकारणात व्यक्तिविरोध एका मर्यादेपर्यंतच असला पाहिजे पण नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबतीत एका विषयावर देवेंद्र फडणवीस यांना छेडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना उत्तर देण्याचे ठिकाण हे विधानसभा निवडले. ईडीने त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवत अटक केली. इतका गंभीर आरोप नवाब मलिकांवर असतानाही मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला नव्हता. महाविकास आघाडी सरकार कोसळले तेव्हाही जेलमध्ये असूनही नवाब मलिक कॅबिनेट मंत्री होते. या दरम्यान मलिक यांनी जामिनासाठी केलेला अर्ज प्रत्येक वेळी न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. त्यामुळे राजकारणात असूनही देवेंद्र फडणवीसांना व्यक्तिगत पातळीवर जाऊन छेडणे नवाब मलिकांना खूप महाग पडलेले दिसते.
उद्धव ठाकरेंनी वारंवार सरकार पाडून दाखविण्याचे आव्हान भारतीय जनता पक्षाने दीड वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्वीकारले आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 व अन्य 10 असे पन्नास आमदार फोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि 2019 ला घडलेल्या घटनेचा भाजपने राजकीय हिशेब चुकता केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 च्या सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत येण्यास काॅंग्रेस चालढकल करत असताना अचानक अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारांना पाठवून एका दगडात देवेंद्र फडणवीस आणि काॅंग्रेस यांची राजकीय शिकार करत अजित पवारांनाही माघारी बोलावून देवेंद्र फडणवीसांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. तीनच महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पाडून अजित पवारांना पुन्हा सत्तेत आणत 2019 साली झालेल्या अपमानाचा वचपा काढण्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले. अनिल देशमुख आणि संजय राऊत जेलबाहेर आल्यानंतर ही नवाब मलिकांचा जामीन अर्ज तीन - चार वेळा जामीन अर्ज फेटाळला गेला. शेवटी अजित पवारांना फोडताना नवाब मलिकांना बाहेर काढण्याचा शब्द भाजपकडून दिला गेल्यामुळेच नवाब मलिक आज वैद्यकीय कारणांमुळे का होईना जामिनावर आहेत, ईडीचे शुक्लकाष्ठ मागे लागलेले असताना अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आहेत आणि म्हणूनच नवाब मलिक यांनी राजकीय व्यवहारिता पाहून अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला असावा. पण विरोधकांनी राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेल्यांसोबत भाजप कशी तयार झाली असा सवाल उपस्थित करताच पुढील राजकारण पाहात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना थेट पत्र पाठवून नवाब मलिकांना महायुतीमध्ये सामील करून घेण्यास विरोध असल्याचे कळवले.
नवाब मलिकांमुळे आपली राजकीय कोंडी होऊ शकते याचा अंदाज घेऊनच त्यांना सामील न करण्याचे अप्रत्यक्षपणे अजित पवारांना सुचवले आहे. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी हैराण असताना त्यांना मदत देण्याची मोठी मागणी विरोधकांनी लावून धरली होती, त्या विषयाला बगल देण्यासाठीच नवाब मलिकांचे हे लेटरबाॅम्ब चे हत्यार भाजपने उपसले आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याची निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचा घाट घातला जात आहे का? आणि त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीसांना समर्थन देऊ केले असल्याने अजित पवारांची कोंडी होऊ शकते. बघूया हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सुरू झालेले हे प्रकरण कुठपर्यंत जाऊ शकते. 2024 ची आकडेमोड करण्याला भाजपने सुरुवात केली आहे, नवाब मलिकांमुळे त्या वेळी अडचण येऊ शकते असा निष्कर्ष काढूनच हे पत्र लिहिले आहे का? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र कोंडी करण्याची तर फडणवीसांची खेळी नाही ना? नवाब मलिक बोलल्यानंतर सारे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत वाट पाहूयात.......