संभाजी ब्रिगेड व प्रकाश आंबेडकरांसोबत उद्धव ठाकरे मैदान मारणार का?
सुनील शेडोळकर
राजकारणातील अस्थिरता कोणाला कोणासोबत जायला भाग पाडले हे सांगता येत नाही काही वेळा ते गरजेचे आहे म्हणून तर काही वेळा ते अपरिहार्यता म्हणून स्वीकारावे लागते. राजकीय आखाड्यात कोण वेळी उपयोगी पडेल अन् कोण भारी पडेल हेही न कळण्यासारखे सध्याचे राजकीय वातावरण बनले असल्याने सर्वसामान्य जनता बुचकळ्यात पडली आहे हे मात्र नक्की. पंचवीस वर्षांच्या भाजप बरोबरच्या युतीत शिवसेना सडली असा राजकीय बाॅम्ब टाकून 2019 मधील विधानसभा निवडणूक निकालानंतर युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा कौल मिळाल्यानंतर आपला पारंपारिक ठाकरी बाणा दाखवत भारतीय जनता पक्षाला व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड देत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांना सोबत घेत महाविकास आघाडी स्थापन करत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री बनले.
सत्तेसाठी राजकारणातील सर्वात क्लेशदायक वितुष्ट म्हणले पाहिजे. बंदखोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांचे काय बोलणे झाले होते आणि ते निवडणूक निकालानंतरच बाहेर कसे आले हे एक न उलगडणारे कोडे आहे. आपली हातातोंडाशी आलेली सत्ता गेल्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी फोन न उचलल्याचे शल्य देवेंद्र फडणवीस यांना जास्त झाले असावे अशी त्यांची कृती व देहबोली आधी पहाटेच्या शपथविधीतून व नंतर विरोधी पक्षनेते झाल्यानंतर विधानसभेत सरकारवर तुटून पडण्यातून स्पष्टपणे जाणवत होती. भाजप सोबत युती तोडल्यानंतर ची दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरेंची शरद पवारांच्या भरवशावर गेली. पुढील पंचवीस वर्षे महाविकास आघाडी सरकार सत्तेत राहण्याचा गरज नसताना व्यक्त केलेला संजय राऊतांचा फाजिल आत्मविश्वास आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभांमधून हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाविण्याचे आव्हान देवेंद्र फडणवीसांना अधिक अस्वस्थ करणारे ठरले व सरकार पाडण्याचे महानाट्य घडले. सत्तेवर असणाऱ्या व्यक्तींनी संयमाने व मोजून मापून बोलण्याचा राजकारणातील शूचिरभूतपणा न पाळल्यानेच उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले किंवा ते पाडले गेले हे सांण्यास कुण्या ज्योतिषाची गरज नाही. नवल म्हणजे राजकारणातील चाणक्य असलेले शरद पवार सोबत असताना हे झाले त्यामुळे उद्धव ठाकरे हे एकाकी पडले. सरकार पडल्यावरच घरुन कारभार हाकणारे उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले.
सरकार, पक्ष, पक्षचिन्ह, आमदार, खासदार व कार्यकर्त्यांची कुमक गमावल्यानंतर उद्धव ठाकऱ्यांना नव्या साथीदारांची गरज भासू लागली अन् वेगवेगळे पर्याय शोधत असताना आधी प्रकाश आंबेडकर व नंतर संभाजी ब्रिगेड त्यांच्या सोबत येण्यास तयार झाल्याच्या बातम्या झळकल्या. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली संघटना. 1966 साली त्याचे पक्षात रुपांतर केले. शिवसेनेचे वैशिष्ट्य असे आहे की, हा आजच्या महाराष्ट्रातील जातीव्यवस्थेचे लेबल न लावून घेतलेला एकमेव राजकीय पक्ष अशी त्यांची ओळख आहे. काॅंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने बाळासाहेबांना जातीयवादी पक्ष म्हणून अनेक वर्षे हिणवले, पण बाळासाहेब ठाकरे यांनी कधी त्याची तमा बाळगली नाही. बाळासाहेबांनी शिवसेनेत सर्व जातींचे जेवढे कार्यकर्ते जमवले आहेत तेवढे कदाचित अन्य कुठल्याच पक्षात नसतील. काॅंग्रेस म्हणजे दलित मुस्लिमांची व्होट बँक, भाजप सवर्णांचा, राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा अशी जातींची विभागणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत जोडली जायची पण शिवसेना त्यापेक्षा वेगळी ठेवण्यात बाळासाहेबांनी यश मिळवले.जात बघून बाळासाहेबांनी कधीच कार्यकर्ते जोडले नाहीत. त्यांच्या मुळेच मनोहर जोशी हा ब्राह्मण कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला हे आजच्या जातीय लेबल बघून पक्षात स्थान देण्याच्या जातीव्यवस्था पाळणाऱ्या राजकारणाकडे पाहता लक्षात येते.
बाळासाहेबांनी ज्या उंचीवर शिवसेनेची प्रतिष्ठा नेली त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची किंगमेकर च्याच भूमिकेत स्वतः ला कायम प्रोजेक्ट केले व त्याचा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत दबदबा कायम राहायचा. अगदी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याशी त्यांचा डायलॉग असायचा त्याचा नेहमीच समोरुन आदर ठेवला जायचा. उद्धव ठाकरे यांना मात्र ठाकऱ्यांची ती पत झेपावली नाही किंवा त्यांची कुवत नसताना पक्ष त्यांच्या ताब्यात दिला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगलें संबंध ठेऊ शकले असते, कारण राजकारणात शालीनता ही तुमची उंची वाढविणारी बाब असते. स्वतःचेच सरकार पाडण्याचे आव्हान द्यायचे अन् तेही एका जखमी वाघाला हे राजकीय शहाणपण नक्कीच नाही. पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत राहूनही त्यांच्या लक्षात कसे आले नाही याचे नवल वाटते. 2017 साली मुंबई महानगरपालिका राज्यात एकत्र सत्तेत असतानाही शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले. 84 सदस्य शिवसेनेचे व 82 सदस्य भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या व आजची भाजपची फोडाफोडीचे राजकारण पाहता भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत बसविणे देवेंद्र फडणवीस यांना अजिबात अशक्य नव्हते, पण एकनाथ शिंदे हे फडणवीसांना भेटले अन् फडणवीसांनी मुंबई महापालिकेवरील पूर्ण ताबा सोडला. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत संवाद सुरू ठेवला असता तर आज कदाचित शिवसेनेला नवे मित्र शोधण्याची वेळ आली नसती. आणि मित्रही असे सोबतीला घेतलेत की ज्यांचे संपूर्ण ओझे उद्धव ठाकरे यांनाच उचलून घ्यावे लागणार.
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर भारतातील सर्वंच राजकीय पक्ष राजकारणाचे धडे गिरवत गिरवत सत्तेवर आले व अनेक वर्षे ती सत्ता उपभोगली व उपभोगत आहेत त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सख्खे नातू असलेले प्रकाश आंबेडकर आपल्या धरसोड वृत्तीमुळे राजकारणात कधी स्थिरावले नाहीत. जो दलित समाज गोंजारत इंदिरा गांधींनी दलितांचा वोट बँक म्हणून उपयोग करून घेतला तो काॅंग्रेस चा हक्काचा जनाधार प्रकाश आंबेडकर कधीच स्वतः साठी उभा करु शकले नाहीत, उलट काॅंग्रेस कडून उभे राहिल्यावरच अकोल्यातून त्यांना खासदारकी मिळाली. राजकारणात छोट्या पक्षांसाठी व्यवहारिक शहाणपण गेल्या काही दशकांत कमालीचे लोकप्रिय झाले आहे. बिहारमध्ये रामविलास पासवान व महाराष्ट्रात रामदास आठवले ही उत्तम उदाहरणे आहेत. स्वतः चा एखादा खासदार असताना व काही वेळा तोही नसताना दलित उमेदवार म्हणून त्यांनी केंद्रात मोठ्या कालखंडासाठी मंत्री पद भूषविले. त्या मानाने आर्थिक, सामाजिक, भावनिक व शैक्षणिक बाबतीत अधिक सरस असलेल्या प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांचा असलेला लौकिक इनकॅश करता आला नाही. वंचित बहुजन आघाडी करून त्यांनी गेल्या निवडणुकीत ओवीसींना सोबत घेत दलित मुस्लिम एकगठ्ठा मतांसाठी जोगवा मागितला पण त्याचा ओवीसी व इम्तियाज जलील यांना फायदा झाला, स्वतः आंबेडकरांनाही त्याचा फायदा झाला नाही हे विशेष. उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांसोबत कशी राजकीय डील करतात त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
संभाजी ब्रिगेड ही मराठा युवकांची सामाजिक संघटना आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकीत सर्वाधिक डिसायडिंग फॅक्टर म्हणून ओळखला जातो, त्यानंतर ओबीसी, दलित, मुस्लिम व अन्य बाकी. त्यामुळे मराठा उमेदवारांना सर्वंच राजकीय पक्षांतून विशेष नजरेने पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अहमदनगर जिल्ह्यातील एका बलात्कार व खून प्रकरणात एक मराठा लाख मराठा अशी एकीची हाक देत पीडितेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रात तब्बल 108 मूकमोर्चे काढण्यात आले . अतिशय शिस्तबद्ध व कुठल्याही पुढाऱ्यांना मज्जाव करत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याची राज्यभर चर्चा झाली. एकाही मोर्चाला कुठल्याही अप्रिय घटनांनी गालबोट लागले नाही हे वैशिष्ट्य. त्यानंतर फडणवीसांच्या काळातच मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. बहुतेक मराठा समाजासाठी हे आरक्षण आवश्यक असल्याने सरकारने नारायण राणे समितीच्या शिफारशी स्वीकारून 10 टक्के आरक्षण देऊ केले . त्याविरुद्ध झालेली न्यायालयीन लढाईतही हे आरक्षण टिकवले. या दोन्ही आंदोलनात संभाजी ब्रिगेड चे योगदान मोठे होते. अर्थात संभाजी ब्रिगेडला शरद पवारांची फूस होती व केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यानेच शरद पवारांचे हे कुभांड असल्याचा आरोप भाजपने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने आता संभाजी ब्रिगेड याच उद्धव ठाकरे यांच्याशी पक्षाशी राजकीय सोयरीक करु पाहात आहेत. बघूयात प्रकाश आंबेडकर व संभाजी ब्रिगेड यांची साथ उद्धव ठाकरे यांचा राजकीय वनवास संपवते का या पक्षांनाही आपल्या सोबत ठाकरे गटांगळ्या खाऊ घालतात. 2024 पूर्वीच याचा लेखाजोखा समोर येईलच.....!