शिवसेना - भाजपची 25 वर्षांची युती का तुटली?
सुनील शेडोळकर
1980 साली पूर्वीचा जनसंघ असलेला पक्ष भारतीय जनता पार्टी नवाने ओळखला जाऊ लागला. अटलबिहारी वाजपेयी यांनी भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली होती. 1947 साली देश स्वतंत्र झाला पण पाकिस्तान हा शेजारी राष्ट्र म्हणून उदयास येऊनच. देशाची फाळणी ही हिंदू - मुस्लिम या वादातूनच झाली. मोहम्मद जिना हे पाकिस्तानचे तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान म्हणून या दोन्ही देशांनी आपापला राजकीय कारभारास सुरुवात केली. या देशावर फाळणी लादली गेली असा आरोप पूर्वी जनसंघ करायचा. 1980 नंतर भारतीय जनता पक्षाने ती जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. स्थानिक मुद्दे आणि मराठी अस्मितेच्या नावावर शिवसेना मुंबई गाजवत होती. अटलबिहारी वाजपेयी अध्यक्ष झाल्यानंतर भाजपने राम मंदिराचा मुद्दा तापवायला सुरुवात केली होती तर शिवसेनेने मुंबई महानगरपालिका ताब्यात घेत राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. मुंबई नंतर ठाण्यातही बाळासाहेबांनी शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकावला होता. 1986 साली छत्रपती संभाजीनगर ( तेव्हाचे औरंगाबाद) मध्ये हिंदू - मुस्लिम जातीय दंगलीने होरपळले. त्यानंतर लगेचच 1987 साली झालेल्या औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेने मुंबई -ठाण्याबाहेर पहिले राजकीय पाऊल टाकले. औरंगाबाद महानगरपालिका जिंकून शिवसेनेला राज्यस्तरीय पक्ष म्हणून ओळख मिळाली आणि इथूनच शिवसेनेला महाराष्ट्राची सत्ता खुणावूत असल्याचे जाणवले. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय बस्तान बसविण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चेच्या फैरी झाडल्या. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ही भाजपची दुसरी फळी महाराष्ट्रात उतरली होती. महाजन - मुंडे हे साले - मेव्हणे दोघेही मराठवाड्यातील असल्याने बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तृत्व आणि हजरजबाबीपणा त्यांनी जवळून बघितला होता. भारतीय जनता पक्षाला जर महाराष्ट्रात पाय रोवायचे असतील बाळासाहेब या खणखणीत नाण्यासोबत आपण गेले पाहिजे हे हेरून शिवसेनेचा लहान भाऊ म्हणून दुय्यम भूमिकेत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश केला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी विक्रमी बहुमताने काॅंग्रेसला विजयी केले होते, पण बोफोर्स घोटाळ्यात राजीव गांधींचे सरकार अडकले. विश्वनाथ प्रतापसिंह या त्यांच्याच शिलेदाराने राजीव गांधींसमोर दंड थोपटले व जनता दलात सामील झाले. भारतीय जनता पक्षाने काॅंग्रेस मधील अंतर्गत कलहाचा पुरेपूर फायदा उठवला. 1989 च्या लोकसभेत काॅंग्रेसचा पराभव होऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भाजपने बाहेरून पाठिंबा दिल्याने पंतप्रधान झाले. 1980 साली स्थापन झालेल्या पक्षाला अप्रत्यक्षरित्या का होईना पण 1989 साली सत्तेत आली. बाहेरुन पाठिंबा दिल्यानंतर पूर्ण सत्तेची आस लावून बसलेल्या भारतीय जनता पक्षाने अडवाणींची रथयात्रा मुलायमसिंह यांनी रोखताच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढून सरकार पाडले. विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्याने देशभर काहुर माजलेले असताना विशिष्ट जातींचा पक्ष या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राजकारणाची कुस बदलली. मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्याने 27 टक्के ओबीसींना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळाले. भारतीय जनता पक्षाने ओबीसींना मिळणारे आरक्षण इनकॅश करण्यासाठी देशभर जाळे पसरवले. त्यात महाराष्ट्रात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना जबाबदारी दिली. मुंडे - महाजन या भारतीय जनता पक्षाच्या एका नाण्याच्या महाराष्ट्रासाठी दोन बाजू ठरल्या. गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजात येत असल्याने ओबीसी जोडणीसाठी भाजपने गोपीनाथ मुंडेंचा उपयोग करून घेत जनाधार वाढविण्यात आघाडी घेतली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला सोबत घेऊन युती केली. देशात भाजप व महाराष्ट्रात शिवसेना असा अलिखित करार करून महानगरपालिकेच्या सत्तेपर्यंत मर्यादित असणारी शिवसेना 1995 साली महाराष्ट्राच्या सत्तेत आली. शिवसेनेचे मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री तर भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. काॅंग्रेस च्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं खोदून काढत राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिले हे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील व राज्यातील नेते खुल्या मनाने मान्य करायचे. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांची 2002 मध्ये झालेली एंट्री शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतील सलोख्याचा मुद्दा ऐरणीवर आणला गेला. छगन भुजबळ हे नारायण राणे, राज ठाकरे शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे होते हेही बाहेर जाणाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मी मुंबईकर हे कॅम्पेन यशस्वीपणे राबवून उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका जिंकल्यावर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्याने बाळासाहेबांसारखीच अपेक्षा उद्धव यांच्याकडून करण्यात आली. जी पूर्ण होणं कधीच शक्य नव्हते. 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आणि 2013 मध्ये नरेंद्र मोदी यांचा झंझावात आला आणि 2014 मध्यें भारतीय जनता पक्षाचे बहुमत मिळवून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. जागावाटप मनाजोगे न झाल्याने भाजप व शिवसेना ही युती संपुष्टात आली. स्वबळावर निवडणूक लढवूनही शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि इथूनच राजकिय भावकीची भाकरी फिरवली गेली. बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून सत्तेच्या राजकारणात नवखा असलेला भारतीय जनता पक्ष कधी शिवसेनेचा मोठा भाऊ झाला हे शिवसेनेला कळलेच नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नरेंद्र मोदींनी दिली आणि इथूनच शिवसेनेला दोन पावले मागे ढकलले गेले. उद्धव ठाकरे तसे सभ्य गृहस्थ आहेत. शिवसेनेला भाजपसोबत सरकारमध्ये मजबुरीने यावे लागले. तसे केले नसते तर जी शिवसेना 2022 साली फुटली ती 2014 लाच फुटली असती. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा सत्तेत घालवलेला काळ शिवसेनेसाठी कटु आठवणी त्याही दीर्घ काळासाठी वेदना देणाऱ्या ठरल्या. 2019 ला नरेंद्र मोदी पुन्हा आल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढणे हे शिवसेनेसाठी आवश्यकच होते.
भारतीय जनता पक्ष कानामागून येऊन तिखट झाल्याची भावना मंत्रालयातील सहावा मजला पाहून शिवसेना जास्त व्यथित दिसायची. त्यामुळे शिवसेनेने संजय राऊत यांना शरद पवारांसोबत संधान साधूनच 2019 च्या विधानसभा निवडणुका लढविल्या. भाजप - शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये यासाठीच शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा बंदखोलीतील विषय छेडून भारतीय जनता पक्षापासून नेहमीसाठी वेगळं होण्याची पावलं टाकायला सुरुवात केली. भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून आकड्यांचे त्रैराशिक जमत असल्याने सत्तेची मोट बांधायची जबाबदारी शरद पवारांवर सोपवत कालपर्यंत लहान भाऊ असलेला व आज अचानक मोठा भाऊ झाला म्हणून उद्या तो आपला भाऊच नसावा अशी धूर्त खेळी करत देवेंद्र फडणवीस यांच्या हाता- तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून नरेंद्र मोदी व अमित शहा यांना धक्का दिला. राजकारणात सत्ता महत्वाची समजणाऱ्यांना सध्या सुगीचे दिवस आलेले दिसतात. शरद पवार, संजय राऊत यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेने बदललेली ही राजकीय कुस भाजपसाठी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी करा अथवा मरा अशी परिस्थिती घेऊन यावी अशी परिस्थिती निर्माण झाली. उद्धव ठाकरे यांचा स्वतः मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा शिवसेनेची आजवरची सर्वात मोठी चूक समजली जाते. या चुकीचा बदला म्हणून देवेंद्र गावंडे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून उद्धव ठाकरे व शरदचंद्र पवार यांना सव्याज परतफेड केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून 2024 ची तयारी मोदी करत आहेत. बघूया 25 वर्षांची युती तोडून सत्तेच्या सारीपाटावरील आपल्या सोंगट्या शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे फिरवतात. राजकारणातील घसरलेला स्तर हा आणखी काय काय करायला लावतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे, कारण 2024 ची नवी निवडणूक येत आहे मात्र खेळाडू मात्र जुनेच आहेत. बघूया कोण बाजी मारतात.....!