राज ठाकरेंची भूमिका मनसेला सत्तेचा मार्ग दाखविणार का?

राज ठाकरेंची भूमिका मनसेला सत्तेचा मार्ग दाखविणार का?

शरद पवारांनंतर राजकीय पक्ष काढून तो कायम चर्चेत ठेवणारा दुसरा नेता म्हणजे राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते.

- सुनील शेडोळकर

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतः च्या हिमतीवर स्वतः चा राजकीय पक्ष काढून तो टिकविण्याचे शिवधनुष्य फार कमी लोकांना ते पेलवता आलेले आहे. बदलत्या राजकीय समीकरणात तर काढलेला राजकीय पक्ष फोडणारेही उदयास आलेले असल्याने आपल्या आयडॉलॉजीवर पक्षांची निर्मिती, त्याचे संगोपन, पक्षाने बाळसं धरल्यानंतर तो वाढविणे, निवडून आणणे, सत्तेपर्यंत नेणे आणि त्यानंतर त्याचे अस्तित्व टिकवणे अशा क्रमवारीनुसार पक्षांचा आलेख मांडायचा ठरविले तर किमान 15-20 वर्षांचा कालावधी नक्कीच लागू शकतो.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसची राजवट लोकांच्या अंगवळणी पडली. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, जनता पक्ष, समाजवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, आरपीआय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काही नावं महाराष्ट्रात सांगता येतील, आणखीही काही नावं असू शकतात. निवडणुकीच्या काळात काही राजकीय पक्षांचे पेव फुटते आणि निवडणुका संपल्यानंतर गायब होणारेही काही राजकीय पक्ष असतात. पण गेल्या दोन एक दशकांत प्रादेशिक राजकीय पक्षांचे आकलन केले तर शरद पवारांनंतर राजकीय पक्ष काढून तो कायम चर्चेत ठेवणारा दुसरा नेता म्हणजे राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते.

सत्तेत असो वा नसो कोणतीही निवडणूक आली की महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या नावाची चर्चा होत असते. राजकारणाचे बाळकडू अगदी शालेय जीवनापासून गिरवणारे राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व आहे. 2003 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या एका मुलाच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेमध्ये दाखल झाले त्याच्या आधीपासूनच राज ठाकरे यांनी शिवसेनेत आपला जम बसविला होता. बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी म्हणूनही राज ठाकरे यांना शिवसेनेमध्ये बघितले जायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्या काळी असणारे मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ, नारायण राणे यांनीही राज ठाकरे यांना शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरचे स्थान देऊ केले होते. बाळासाहेबांच्या भाषणाची लकब ही राज ठाकरे यांची सर्वात जमेची बाजू समजली जाते. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अनेक सभांमधून राज ठाकरे यांना शिवसेना पक्ष जवळून पाहता आला होता. त्यामुळेच शिवसेनेतील बाळासाहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांना राज ठाकरे यांची मदत व्हायची.

शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंचे लॉन्चिंग हे शिवसेनेसाठी व राज ठाकरे यांच्यासाठी कुस बदलाचे ठरले. उद्धव ठाकरे अतिशय महत्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात तर राज ठाकरे हे खरे बाळासाहेबांचे राजकीय वारस असे प्रोजेक्ट झालेले नेते म्हणून ओळखले जायचे. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ही श्रोतावर्गासाठी पर्वणी ठरावी एवढी त्यांच्या सभेला गर्दी जमायची. गर्दी जमवायची वेळ बाळासाहेबांवर कधीच आली नाही. बोलण्यातील सडेतोडपणा हा बाळासाहेबांच्या वैशिष्ट्यांचा वारसा मात्र राज ठाकरे यांच्याकडे आला आहे. राज ठाकरे जर शिवसेनेत राहिले असते किंवा त्यांना राहू दिले असते तर शिवसेनेला कदाचित भारतीय जनता पक्षाची गरजच उरली नसती. बाळासाहेब ठाकरे यांची पण खूप इच्छा होती की राज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये. पण मराठी माणसाला बहुधा एकत्रित राहण्याचा शाप असावा, अशी मराठी कुटुंबे विभक्त होताना पाहून वाटते. राज ठाकरे यांना शिवसेनेत डावलले जात असल्याची त्यांची भावना दिवसेंदिवस प्रबळ होत चालली होतीच. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर तर राज ठाकरे मोठ्या प्रमाणात अस्वस्थ दिसायचे.

बाळासाहेबांच्या उपस्थितीत उद्धव यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नेमण्याचा निर्णय ही राज ठाकरे यांना घ्यायला लावला गेला, एवढी अवहेलना झाल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः चा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला जो बाळासाहेबांसाठी अतिशय वेदनादायक होता. ज्या राजला अंगाखांद्यावर खेळवत राजकारणाचे व व्यंगचित्रकाराचे धडे बाळासाहेबांनी दिले तो राज्य आपल्या पासून दूर जाणार या विचाराने बाळासाहेब व्यथित झाले होते. शिवसेनेला नेत्यांनी जय महाराष्ट्र करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांना कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने फोडले होतेच पण त्यांच्यापैकी कुणीही स्वतः चा राजकीय पक्ष काढलेला नव्हता, त्यामुळे राजकीय पक्ष काढून तो टिकविण्याचे व वाढविण्याचे जिकरीचे काम राज ठाकरे यांनी करु नये, असे बाळासाहेबांना शेवटपर्यंत वाटायचे, पण पुलाखालून एवढे पाणी वाहून गेले होते की राज ठाकरे यांना बाळासाहेबांच्या हयातीतच राजकीय पक्ष काढावा लागला.

राज ठाकरे यांनी 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 7 आमदार निवडून आणले. बाळासाहेबांच्या समोर राज ठाकरे यांच्या मनसेने लाखालाखाची शिवसेनेची मते खाल्ल्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील उमेदवार पाडून राजकारणातील आपली पॉवर दाखवली. टोलवसुली, मुंबईतील मराठी पाट्या लावणे, रेल्वे बोर्डाच्या परीक्षा मराठीतून घेण्याची सुरुवात करण्यास राज ठाकरे यांनी भाग पाडल्यानंतर राज ठाकरे यांचे राजकीय वजन कमालीचे वाढले. स्वतः चा पक्ष काढणे जेवढे अवघड असते त्याही पेक्षा तो टिकवणे जास्त अवघड असते. मनसेची प्रतिमा खळखट्याक अशी करुन शिवसेना, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व पक्ष राज ठाकरे यांच्यावर तुटून पडायचे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज ठाकरे एकाकी पडले. शिवसेनेकडून व उद्धव ठाकरे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी विविध दुषणे मनसेला देण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जनता पक्षाला आपल्या छोट्या भावाच्या रुपात शिवसेना पाहात होती. पण, बाळासाहेबांनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. बाळासाहेब ज्या प्रकारे भाजपवर टीका करायचे ते बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत या टीकेला टोकाची धार लावत भारतीय जनता पक्षाला वेसण घालण्याचाही प्रयत्न झाला, पण बाळासाहेबांचा जो आदर होता तो उद्धव ठाकरे यांना न देता भाजपकडून कुरघोडीचे राजकारणास सुरुवात झाली.‌ त्या काळात मनसेने दोन पावले मागे येत शिवसेनेला टाळी दिली होती. पण उद्धव ठाकरे यांनी ती टाळी स्वीकारली नाही. कारण त्यांना राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा धोका वाटायचा.

राजकारणात केव्हा कोणती भूमिका वाट्याला येईल हे सांगता येत नाही. 2013 साली नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना गुजरातमध्ये बोलावून त्यांचा वापर 2014 साठी करून घेतला तर शरद पवारांनी 2019 साठी लाव रे तो व्हिडिओ असे म्हणत मोदींच्या विरोधात रान उठवायला लावले. त्यावेळी राज ठाकरे यांच्या सभांना लाखांची गर्दी जमायची जी शरद पवारांनाही जमायची नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षांसाठी अनुकूल ठरताना दिसत आहे. विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांच्यावर डोरे टाकून ठेवले आहेत पण राज ठाकरे यांनी त्यांना अजून तरी प्रतिसाद दिलेला नाही. ईडीच्या रडारवर तेही आहेत, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षासाठी तेवढे अनुकूल वातावरण नक्कीच नाही. कॉंग्रेस स्वबळावर जाऊ शकते, भाजप-एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्यात जागांवरुन रस्सीखेच होणार. शिवसेना शरद पवारांमागे गेली तर उरला सुरला जनाधार ते गमावून बसतील. उद्धव ठाकरे यांनी फोन केला तर राज ठाकरे तो उचलतील का असे माध्यमांना विचारत आहेत याचा अर्थ राज ठाकरे यांना जनमत मिळण्याची शक्यता आहे.

ऐनवेळी निवडणुकीत राज ठाकरे यांनी कुणाची सुपारी न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिलेदारांना बळ दिले तर बाळासाहेबांच्या सभांच्या जुन्या आठवणी राज ठाकरे पुन्हा ताज्या करण्याची धमक त्यांच्यात आहे. मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेला हद्दपार करणे हे एकमेव उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाचे असू शकते त्यासाठीच ते राज ठाकरे यांना गळ घालू शकतात, पण स्वतंत्र बाणा घेऊन जर राज ठाकरे उतरले तर सत्ता एकदा देऊन पाहा या त्यांच्या मतदारांना साद घालण्याला प्रतिसाद मिळू शकतो. बघूया मोदी-ठाकरे-पवार यांचा चक्रव्यूह तोडून राज ठाकरे सत्तेचे सीमोल्लंघन करुन बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय पोकळी भरून काढतात का?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com