Sangeeta Bijlani : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रीच्या फार्महाऊसवर चोरी व तोडफोड; मौल्यवान वस्तू गायब
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणाजवळील तिकोना गावातील फार्महाऊसवर चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या जवळपास चार महिन्यांनंतर आपल्या फार्महाऊसला गेल्या असता, घरात झालेली तोडफोड आणि अनेक मौल्यवान वस्तूंची गैरहजेरी लक्षात आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुख्य प्रवेशद्वार आणि खिडक्यांच्या ग्रिल तोडण्यात आले होते. घरात ठेवलेले टीव्ही, फ्रिज, बेड अशा अनेक महत्त्वाच्या वस्तू चोरीला गेल्याचे त्यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही फुटेजही नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फार्महाऊस पाहण्यासाठी त्या दोन नोकरांसोबत गेल्या होत्या. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलीस तपास सुरू असून, नुकसान आणि चोरीची अचूक रक्कम लवकरच स्पष्ट होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले.
संगीता बिजलानी यांना ही घटना अतिशय धक्कादायक वाटली असून, वडिलांच्या आजारपणामुळे त्या दीर्घकाळ फार्महाऊसपासून दूर होत्या. त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही कारवाई केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा सर्वांगीण तपास सुरू आहे.