Govind Pansare : न्यायालयाचा मोठा निर्णय! गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना जामीन
कम्युनिस्ट विचारवंत आणि ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सर्व १२ संशयित आरोपींना आता जामीन मिळाल्याची मोठी घटना समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून उर्वरित तिघे आरोपी – डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर – यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या तिघांव्यतिरिक्त ९ आरोपींना यापूर्वीच जामीन मिळाला होता. उर्वरित तिघे जामीनाविना कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात होते. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या तिघांचाही जामीन अर्ज मंजूर केला आणि त्यामुळे या प्रकरणातील सर्वच आरोपी आता जामिनावर मुक्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. संस्थेच्या मते, आरोपींना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आलं.
काय आहे हत्याकांड?
20 फेब्रुवारी 2015 रोजी, गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील घराजवळ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. ही घटना डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या मालिकेशी जोडली गेली. अनेक संशयितांची नावं या चौकशीत पुढे आली, मात्र तपास यंत्रणांना निश्चित पुरावे मिळवण्यात सातत्याने अपयश येत राहिलं.
गौरी लंकेश हत्या प्रकरणात काही आरोपींना अटक झाल्यानंतर पानसरे प्रकरणातील तपासाला गती मिळाली, मात्र आजच्या निर्णयानंतर तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या निर्णयानंतर प्रकरणाच्या पुढील कायदेशीर घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.