Chennai Actress Murder : हाडं, आतडी, कापलेले हात-पाय! प्लास्टिक पिशव्यांतून सापडले अभिनेत्रीच्या शरीराचे तुकडे; खुनी निघाला तिचाच...

Chennai Actress Murder : हाडं, आतडी, कापलेले हात-पाय! प्लास्टिक पिशव्यांतून सापडले अभिनेत्रीच्या शरीराचे तुकडे; खुनी निघाला तिचाच...

चेन्नई शहर हादरवून गेलं आहे. पल्लिकरनई येथील डम्प यार्डमध्ये पडलेल्या एका पॉलिथिन पिशवीकडे वळलेल्या नजरेने एका अमानुष गुन्ह्याचा परदा उचलला.
Published by :
Prachi Nate
Published on

एका माणसाने रोजच्या रस्त्याने चालत जाताना जे पाहिलं, त्याने चेन्नई शहर हादरवून गेलं. पल्लिकरनई येथील डम्प यार्डमध्ये पडलेल्या एका पॉलिथिन पिशवीकडे वळलेल्या नजरेने एका अमानुष गुन्ह्याचा परदा उचलला. त्या पिशवीतून डोकावणाऱ्या बोटांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि जेव्हा ती उघडण्यात आली, तेव्हा समोर आला एका महिलेचा कापलेला हात. काही वेळातच पायही सापडले.

ही घटना घडत असतानाच अड्यार नदीच्या काठावरून जाणाऱ्यांनी आणखी एक पिशवी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. आणि मग सुरू झाली एक साखळी शहराच्या विविध भागांतून अशाच अनेक पिशव्या सापडू लागल्या. कशात आतडी, कशात हाडं, तर कशात कापलेले हात-पाय.

संध्याकाळपर्यंत जवळपास संपूर्ण शरीराचे तुकडे सापडले होते, मात्र डोके आणि डावा हात गायबच होता. मृत महिला अंदाजे ३० ते ४० वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले. ओळख नाही, चेहरा नाही, आणि तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी. पोलिसांसमोर ही एक ‘ब्लाइंड मर्डर’ केस होती.

डेप्युटी कमिशनर मुथुस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष तपास पथकं तयार करण्यात आली. पोलिसांना शंका होती की डम्प यार्डमध्ये आणखी अवशेष असतील. त्यामुळे ११,७०० टन कचरा तपासण्यात आला. त्यातून पोलिसांना मृतदेहाचा धड आणि इतर काही अवशेष मिळाले. मात्र, महत्त्वाचे तुकडे डोके आणि डावा हात - अद्याप सापडले नव्हते.

संपूर्ण तपासात महत्त्वाचा वळणाचा क्षण आला, जेव्हा पोलिसांनी मृतदेहाच्या डाव्या हातावरील दोन टॅटूंवर लक्ष केंद्रित केलं. एक टॅटू होता शिव-पार्वतीचा आणि दुसरा ड्रॅगनचा. हे टॅटू कुणाचे असू शकतात, याचा शोध सुरू झाला.

त्याचवेळी थूथुकोडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने आपली ३८ वर्षीय मुलगी ‘संध्या’ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. संध्या विवाहित होती, दोन मुलं होती, आणि ती जाफरखानपेट येथे आपल्या नवऱ्यासोबत राहत होती. तिचा पती बालाकृष्णन हा चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक होता.

पोलिसांनी संध्याच्या कुटुंबीयांना बोलावून मृतदेहाच्या तुकड्यांशी ओळख पटवण्यास सांगितलं. संध्याच्या आईने हातावरील टॅटू आणि शरीरावरील तीळ पाहून ती तिचीच मुलगी असल्याचे सांगितले. शिवाय, तुकड्यांमध्ये आढळलेले काही दागिनेही संध्याचेच असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले. ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली आणि ती संध्याच्या कुटुंबाशी जुळली. यामुळे ‘टॅटू गर्ल’ संध्याची ओळख पक्की झाली.

तपासाचा फोकस आता संध्याच्या पती बालाकृष्णन याच्यावर केंद्रित झाला. प्रथमदर्शनी तो सहानुभूती दाखवत होता, पण पोलिसांच्या कसोशीने विचारपूस सुरू होताच त्याचं बडबडू रूप उघडं पडलं. तपासाच्या दरम्यान त्यानेच संध्याची हत्या केल्याची कबुली दिली.

घरगुती वाद, ताणतणाव आणि संशयाचे सावट हे यामागची कारणं असल्याचं उघड झालं. संध्याची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या भागांत फेकले, जेणेकरून ओळख पटू नये.

चेहरा नाही, पुरावे नाहीत, आणि सुरुवातीला कोणताही धागा नव्हता. तरीही चेन्नई पोलिसांनी सूक्ष्म तपास आणि संयमाच्या जोरावर संध्याच्या हत्येचा गूढ गुन्हा उघडकीस आणला. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. एका आईच्या काळजाला तडा गेला, आणि दोन मुलांवर आयुष्यभरासाठी दु:खाचं सावट पडलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com