Latur : निर्दयी बाप ! चॉकलेटसाठी पैसे मागितले म्हणून 4 वर्षीय लेकीचा आवळला गळा
लातूर जिल्ह्यातील भीमा तांडा (ता. उदगीर) येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. केवळ चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने एका चार वर्षांच्या चिमुकलीचा जन्मदात्यानेच साडीने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी दुपारी समोर आली. मृत मुलीचे नाव आरुषी बालाजी राठोड असून, आरोपी वडील बालाजी बाबू राठोड याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वर्षा बालाजी राठोड यांचा विवाह 2019 साली बालाजी राठोड याच्याशी झाला होता. या दांपत्याला आर्यन आणि आरुषी अशी दोन अपत्ये आहेत. मात्र, बालाजी याला दारूचे व्यसन जडले असून, सततच्या वादामुळे पत्नी वर्षा गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी राहत होती.
घटनेच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे ९ जून रोजी, बालाजीने जबरदस्तीने सासरहून आपल्या मुलगी आरुषीला भीमा तांड्यावरील घरी आणले होते. रविवारी दुपारी अडीच च्या सुमारास, वर्षाच्या काकाच्या मोबाईलवर तिच्या सासूने मंगलबाई बाबू राठोड फोन करून माहिती दिली की, बालाजीने आरुषीला घरातच साडीने फाशी देऊन ठार मारले असून, तिला उदगीर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.
ही धक्कादायक बातमी मिळताच वर्षा यांनी तत्काळ रुग्णालय गाठले, मात्र डॉक्टरांनी मुलगी मृत झाल्याचे घोषित केले. रात्री उशिरा या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी राठोडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.