सिगारेटच्या तुकड्यावरून दोषी ठरवत खुनी पतीला जन्मठेप
अनिल ठाकरे | चंद्रपूर : चंद्रपूरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या आरोपीस सिगारेटच्या तुकड्याला पुरावा मानत आरोपी म्हणून सिद्ध केले आहे. रमेश सदाशिव जावळे असे ६१ वर्षीय वृद्ध आरोपी पतीचे नाव असून तो बल्लारशा येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने ११ मे २०१८ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी जावळेने नागपूर खंडपीठात धाव घेत अपील दाखल केले होते. न्यायालयाने हे अपील फेटाळले.
या प्रकरणी न्यायमूर्ती विनय देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली आहे. आरोपीचे विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून त्याचे पत्नीसोबत नेहमी भांडण होत होते. याशिवाय आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. त्यातून त्याने १० जून २०१५ रोजी पत्नीचा खून केला. मात्र, घटना घडली तेव्हा तो उपस्थित नव्हता. यावेळी काही कारणाने तो नागपूरला गेला होता. तसेच, घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील कोणीही नव्हता.
पोलिसांना घटनास्थळी सिगारेटचा तुकडा मिळून आला होता. त्याने स्वतः ओढलेल्या सिगारेटच्या तुकड्यानेच त्याला खोटे ठरवले. त्या तुकड्यावरील अर्काचा डीएनए व आरोपीचा डीएनए सारखा आढळला. याशिवाय, आरोपीच्या कपड्यांवरील व खुनासाठी वापरलेल्या लाकडी काठीवरील रक्ताचा डीएनए आणि मृताचा डीएनए सारखा आढळला. घटनेच्या दिवशी रात्री शेजाऱ्यांनी आरोपीला घरी पाहिले होते. या सर्व बाबींवरून आरोपीनेच पत्नीचा खून केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे, सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह सुनावलेली इतर शिक्षा कायम ठेवली.