Cocaine Smuggling At Mumbai Airport : खजुर ठरले ‘ड्रग्स कॅप्सूल’! मुंबई विमानतळावर तब्बल 21.78 कोटींची तस्करी उघड; चक्क खजुराच्या...

Cocaine Smuggling At Mumbai Airport : खजुर ठरले ‘ड्रग्स कॅप्सूल’! मुंबई विमानतळावर तब्बल 21.78 कोटींची तस्करी उघड; चक्क खजुराच्या...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी एका अत्यंत शक्कल वापरून केलेली कोकेनची तस्करी उधळून लावली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी एका अत्यंत शक्कल वापरून केलेली कोकेनची तस्करी उधळून लावली आहे. खजुराच्या बियांतून कोकेन लपवून भारतात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी अटक केली असून, या कारवाईत तब्बल 2 किलो 178 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य सुमारे 21.78 कोटी रुपये इतकी आहे.

तस्करांनी कोकेनची वाहतूक करण्यासाठी कल्पक पण धोकादायक मार्ग निवडला होता. खजुरांच्या पॅकेटमधील प्रत्येक खजुराची बिया काढून त्या बियांमध्ये अत्यंत कुशलतेने कोकेन भरण्यात आलं होतं. ही खाजगीरी इतकी अचूक होती की, प्रथमदर्शनी कोणालाही संशय येण्याची शक्यता नव्हती. मात्र, मुंबई विमानतळावरील दक्ष सुरक्षा यंत्रणांनी वेळेत लक्ष देत ही तस्करी उघडकीस आणली.

या प्रकरणी सिएरा लिओनहून भारतात आलेल्या प्रवाशासह, कोकेनची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. प्रारंभिक तपासात जप्त करण्यात आलेला पदार्थ 'कोकेन' असल्याची पुष्टी झाली असून, आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या संबंधित कोकेन भारतात कोठून आणले गेले, याचे नेमके स्त्रोत कोणते, आणि ते कोठे पाठवले जाणार होते, याचा सखोल तपास DRI आणि पोलीस विभाग करत आहेत. भारतात या तस्करीचं कोणाशी जाळं जोडलेलं आहे, याचाही शोध घेण्यात येत आहे.

देशाच्या आर्थिक राजधानीच्या प्रवेशद्वारावर इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करी रोखण्यात यश मिळाल्याने, DRI व विमानतळ सुरक्षा यंत्रणांचं मोठं कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com