पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू… मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांचे पतीला भावनिक पत्र

पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू… मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांचे पतीला भावनिक पत्र

Published by :
Published on

मेळघाटच्या हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी तीन पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. एक पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना तर दुसरे त्यांचे पती राजेश मोहिते आणि तिसरे आपल्या आईच्या नावे आहे. ही तिन्ही पत्र धारणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. डीएफओ विनोद शिवकुमार यांच्याकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख या पत्रांमध्ये आहे.

दीपाली चव्हाण यांनी आपल्या पतीला अतिशय भावनिक पत्र लिहिले आहे. 'मी खूप सहन केलं, पण आता माझी लिमिट खरंच संपली आहे. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते, पण सुट्टी देखील तो (शिवकुमार) मंजूर करत नाही. साहेब मला काय काय बोलले, ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय, मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेलेय. खरंच भरून गेलेय. साहेबाने मला पागल करून सोडलंय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही, जितका शिवकुमार साहेब करतात, अशी तक्रारही त्यांनी या पत्रात केली आहे.

'मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर, मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ, पण आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे,' अशी निर्वाणीची भाषाही या पत्रात आहे.

'मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जीवापेक्षा ज्यादा, कारण आता मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू…,' असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com