Satara Doctor Case : डॉ.संपदा मुंडेंवर मूळ गावी अंत्यसंस्कार! 'आमच्या मुलीला न्याय द्या' मृत महिला डॉक्टरच्या नातेवाईकांची सरकारकडे मागणी
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये बीडच्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. अखेर 8 तासांनंतर डॉक्टर महिलेच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात रात्री उशिरा डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आई-वडील भाऊ यांच्यासह नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी नातेवाईकांची मागणी आहे. यातील आरोपी कोणीही असो, त्याला सोडू नका, असं नातेवाईक म्हणतायत.
गुरुवारी 23 ऑक्टोबरला साताऱ्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहत आपल्या आत्महत्येच कारण स्पष्ट केलं होत. यानंतर कालपासून सुरु झालेल्या तपासणीसंदर्भात अनेक नवीन नवीन मुद्दे समोर आले आहेत. ज्यामुळे या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे.
डॉ. संपदा मुंडे असं त्या महिला डॉक्टरच नाव असून काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. ”माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” अशी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. अखेर गुरुवारी रात्री डॉ. संपदा मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
