बाईकवरून पाठलाग, नको तिथे स्पर्श; मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोराला महिला पोलिसाचा दणका
शहरातील बन्सीलालनगर आणि आसपासच्या परिसरात शिक्षणासाठी राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या धडाडीमुळे छेडछाड करणाऱ्या टवाळखोराला चांगलाच धडा मिळाला आहे.
मागील काही दिवसांपासून एक टवाळखोर दुचाकीवरून येत मुलींचा पाठलाग करत होता व नको त्या ठिकाणी स्पर्श करून पळून जात होता. घाबरलेल्या मुलींनी ही बाब कुणाला सांगितली नाही, मात्र घटनांची पुनरावृत्ती झाल्यामुळे काही विद्यार्थिनींनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीची गंभीर दखल घेत, पोलिसांनी अवघ्या काही तासांत या टवाळखोराला अटक केली. विशेष म्हणजे, या टवाळखोराला ज्या-ज्या ठिकाणी तो छेडछाड करत होता, त्या प्रत्येक ठिकाणी नेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हे संपूर्ण दृश्य पाहिले.
महिला पोलीस अधिकाऱ्याने उचललेल्या या ठोस आणि धडाडीच्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘मुलींची छेड काढाल तर खबरदार’ असा स्पष्ट आणि ठाम संदेश देत, इतर टवाळखोरांनाही चांगलीच धडकी भरवण्यात आली आहे.
या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी घेतलेली तत्परता आणि महिला अधिकाऱ्याची कर्तव्यनिष्ठा समाजात एक सकारात्मक उदाहरण ठरली आहे. संबंधित आरोपीवर कठोर शिक्षा व्हावी आणि अशा प्रकारांना आळा बसावा, अशी मागणी आता नागरिकांतूनही होत आहे.