मनसुख प्रकरणी सचिन वाझेंच्या जामीन अर्जावर 30 मार्चला होणार सुनावणी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या जामीनअर्जावर ठाणे सत्र न्यायालयात 30 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. याआधी त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता.
या आधी 13 मार्च रोजी ठाणे न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. त्याचबरोबर त्यांनी नियमित अटकपूर्व जामीनासाठी देखील अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. एटीएसने चार ते पाच पानी असलेला जबाब न्यायालयात सादर केला आहे. तो वाचायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आम्ही पुढील सुनावणीची तारीख मागितली असता न्यायालयाने 30 मार्च ही तारीख दिली, वाझे यांच्या वकील आरती कालेकर यांनी सांगितले.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकामार्फत सुरू आहे. याच प्रकरणात वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. तर, अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत असून एनआयएने सचिन वाझे यांना यापूर्वीच अटक केली आहे.
बहिणीचा अर्ज
या सर्व पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांच्या बहिणीने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी प्रसारमाध्यमे घरी येतात, त्रास देतात, अशी तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याचे आदेश न्यायालयाने राबोडी पोलिसांना दिले.