Noida Nikki Bhati Dowry Case : निक्की प्रकरणातील आरोपींना दिलासा नाही! निक्कीच्या पती आणि सासरच्या मंडळींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
कसना येथील निक्की भाटी प्रकरणात मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी तिच्या पतीसह सासरकडच्यांचा जामिनाचा अर्ज फेटाळला. गेल्या महिन्यात कथित हुंडाबळीच्या छळातून निक्कीला आग लावल्याचा आरोप असून या प्रकरणात तिचा मृत्यू झाला होता.
निक्कीचा पती विपिन भाटी, त्याचा भाऊ रोहित तसेच आई-वडील दया व सतवीर यांना अटक करण्यात आली होती. निक्कीची बहीण कंचन हिने फिर्याद दाखल केली असून तिने विपिनने दीर्घकाळ चाललेल्या हुंड्याच्या मागणी व अत्याचारानंतर निक्कीला आग लावल्याचा ठपका ठेवला आहे.
न्यायालयात आरोपींच्या वतीने वकिलांनी सीसीटीव्ही फुटेज सादर करून विपिन घराबाहेर असल्याचा दावा केला. तसेच निक्कीचा मृत्यू सिलिंडर स्फोटातून झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, फिर्यादी पक्षाने हा युक्तिवाद फेटाळला. पोलिस तपासातही घरात सिलिंडर स्फोटाचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्य न्यायिक दंडाधिकारी आर. के. सागर यांनी आदेश देताना नमूद केले की, आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत व या टप्प्यावर जामिनाचा कोणताही आधार उपलब्ध नाही. त्यामुळे आरोपींचा जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी पुढील सुनावणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.