Baramati Crime : बारामतीत एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; प्रवासी गंभीर जखमी
(Baramati Crime) बारामती इंदापूर मार्गावरील एसटी बसमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण घटना घडली. काटेवाडी येथे थांबलेल्या एसटी बसमध्ये एका व्यक्तीने अचानक कोयत्याने दुसऱ्या प्रवाशावर वार केला. या हल्ल्यात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून आश्चर्याची बाब म्हणजे हल्लेखोराने त्याच कोयत्याने स्वतःवरही वार करत स्वतःला इजा केली.
ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बस काटेवाडी येथे थांबलेली असतानाच संशयित व्यक्तीने कोयता बाहेर काढून अचानक जवळ बसलेल्या प्रवाशावर हल्ला केला. या प्रकारामुळे बसमध्ये खळबळ माजली. इतर प्रवासी घाबरून गेले आणि अनेकांनी बसमधून उतरून बाहेर धाव घेतली.
जखमी प्रवाशाला तातडीने उपचारासाठी बारामतीच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हल्लेखोरालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळी तात्काळ भेट दिली. सुरुवातीच्या तपासात हा प्रकार वैयक्तिक वादातून घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून हल्लेखोराची कसून चौकशी केली जात आहे.