नौदल अधिकारी अपहरण प्रकरणात ‘ट्विस्ट’; मृत्यूचं गूढ उलगडलं!
लोकशाही न्यूज नेटवर्क
सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७) या नौदलात सैनिक पदावर कार्यरत असलेल्या तरुणाचे तीन अज्ञातांनी चेन्नई विमानतळावरून अपहरण करून १० लाख रुपयांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने ५ फेब्रुवारी रोजी तलासरी तालुक्यातील वेवजी गावानजीकच्या जंगलात आणून त्याला जिवंत जाळण्यात आले. पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे यांचा मृत्यू झाला. नौदल सैनिकाने याबाबत जबाब दिला असला तरीही तपासात मात्र वेगळी माहिती समोर आल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
मृत नौदल सैनिक सुरजकुमार दुबे याचे दोन मोबाईल अपहरण करण्याच्या वेळी बंद होते. मात्र, तरीही तिसरा क्रमांक वापरून त्याद्वारे शेयर मार्केटचे व्यवहार केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. १ फेब्रुवारी रोजीपर्यंत हा तिसरा क्रमांक चालू होता, असे त्याच्या एका नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
या क्रमांकविषयी त्याच्या घरच्यांना माहिती नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
मृत सैनिकाच्या बँक खात्याची तपासणी केल्यानंतर शेअर बाजारात त्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे तसेच कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. तसेच मित्रांकडून देखील त्याने लाखोंचे कर्ज घेतले व हे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याने तसे कधीच केले नाही. १५ जानेवारी रोजी सुरज कुमार दुबे याचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्याला सासरवाडीच्या लोकांनी त्याच्या बँक अकाऊंटमध्ये व अन्य मार्गांनी सुमारे ९ लाख रुपये दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र बँक अकाऊंटमध्ये रक्कम शिल्लक राहिलेली नाही.
या प्रकरणाच्या तपासासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी दहा पथके तयार केली असून सुमारे शंभर पोलीस अधिकारी, कर्मचारी विविध पातळीवर तपास करत आहेत.