Pune Crime : फरार गुन्हेगाराचा एन्काऊंटर; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी (ता. मोहोळ) येथे एका मोठ्या कारवाई केली आहे. पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शाहरुख हट्टी (खरे नाव – रहीम शेख) याचा एन्काऊंटर केला. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रडारवर असलेल्या या गुन्हेगाराचा शोध पुणे पोलिसांना लागल्यानंतर ही धडक मोहीम राबवण्यात आली.
शाहरुखवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 308(2) व 329(3) अंतर्गत काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच्यासह नोमान सय्यद (वय 20, रा. हडपसर) या साथीदाराने फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून मोबाईल व रोख रक्कम लुटल्याचा आरोप आहे. पीडित उमर शकील शेख याने तक्रार दाखल केली होती. याशिवाय, दुसऱ्या घटनेत सैय्यदनगर भागात एका ज्येष्ठ नागरिकावरही लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला होता.
नोमान सय्यदला अटक करण्यात आली असून तो आधीपासूनच अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे. मात्र शाहरुख फरार होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक लांबोटी येथे रवाना झाले.
कारवाईच्या दरम्यान पहाटे 3 च्या सुमारास पोलिसांनी वेढा घातल्यानंतर शाहरुखने प्रतिकार करत गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर त्याचा मृत्यू झाला. या कारवाईमुळे शहरातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांकडून सुरू असलेल्या कठोर मोहिमेला बळ मिळाले असून, यामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. घटना 5 वाजता सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली असून, काही पोलिस जखमी झाल्याची माहिती असून अधिक तपास सुरू आहे.