Pune Crime News : आमदाराच्या मामाच्या खूनप्रकरणात पत्नीचा हात; मांत्रिकाच्या मदतीने जादूटोणा
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हडपसर येथील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि वाघ यांची पत्नी मोहिनी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मोहिनीच्या सांगण्यावरुन अक्षयने पाच लाख रुपयांची सुपारी दिल्यानंतर मारेकऱ्यांनी वाघ यांच्यावर पाळत ठेऊन खून करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यासंबंधी एक नवीन माहिती समोर आली आहे.
वाघ यांच्या खूनप्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या तपासात वाघ यांची पत्नी मोहिनी आणि यातील मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर यांनी अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्याने वाघ यांचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान मोहिनीने एका मांत्रिकाची भेट घेऊन वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकारही आरोपपत्रातून उघड झाला आहे. एका मांत्रिकाचीही मदत घेतली. या मांत्रिकाला वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास मोहिनीने सांगितले होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मोहिनी वाघ, अक्षय जावळकर, पवन शर्मा, अतिश जाधव, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.