स्वारगेट बसस्थानकाची सुप्रिया सुळेंकडून पाहाणी, सरकारवर साधला निशाणा, म्हणाल्या, "सत्ता काय कामाची?"
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आगाराची पहाणी केली आणि तेथील सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरलं. महायुती सरकार लाडक्या बहिणींबद्दल बोलतं. पण त्याच लाडक्या बहिणींची सुरक्षा करता येत नसेल तर मग ती सत्ता काय कामाची? असा सवाल त्यांनी विचारला.
पुढे त्या म्हणाल्या की, "राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. सरकारच्या आकडेवारीतूनच ही बाब स्पष्ट झाली आहे. आज तर चाकणमध्ये वर्दीत असलेल्या पोलिसांवर कोयता गँगनं हल्ला केला. काल केंद्रीय मंत्री रक्षाताईं खडसेंच्या लेकींची छेड काढण्यात आली. स्वारगेट अत्याचार प्रकरण तर अतिशय असंवेदनशीलपणे हाताळलं गेलं. मंत्र्यांनी बोलताना संवेदनशीलपणे बोलावं. तसेच जी घटना घडली आणि ज्या दिशेने ही घटना नेली ते अत्यंत वाईट आहे".
नंतर त्या म्हणाल्या की, "त्या मुलीला खूप भीती दाखवली गेली. निर्जन किंवा काळोख्या ठिकाणी हा प्रकार झालेला नाही. मुख्य रस्ता, पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा भयंकर प्रकार घडला आहे. बदलापूर प्रकरण घडलं तेव्हा मी त्यावेळी उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती केली होती. तीच मागणी मी आताही करते. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि गुन्हेगाराला भरचौकात फाशी द्या अशीदेखील मी विनंती करते"