Pune Swargate Accused : स्वारगेट प्रकरणातील आरोपीला दिलासा नाहीच! न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन नाकारल्याने आरोपीच्या अडचणीत वाढ
पुणे सत्र न्यायालयाने स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याचा दुसरा जामीन अर्जही नाकारला आहे. न्यायालयाने या गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित करत आरोपीला जामीन न देता पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
पुण्यातील स्वारगेट बस आगारात घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवले होते. दत्तात्रेय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, शिरूर) याच्यावर बसमध्ये तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली होती. त्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात गाडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी तब्बल 893 पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
गाडे न्यायालयीन कोठडीत असतानाच त्याने वकिलांमार्फत जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पहिला जामीन अर्ज 30 जून रोजी न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच दुसरा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी “आरोपीवर गंभीर गुन्हा नोंदविला गेला आहे आणि परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही” असे स्पष्ट करत अर्ज फेटाळला.
या अर्जाला विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील ॲड. श्रीया आवले यांनी तीव्र विरोध केला होता. न्यायालयाने त्यांच्या युक्तिवादाला मान्यता देत आरोपीला जामीन नाकारला. आता या प्रकरणातील आरोप निश्चिती प्रक्रियेसाठी गाडेला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची पायरी गाठली असल्याचे मानले जात आहे.