Pune Daund: शिक्षकांना तक्रार केल्याचा राग डोक्यात! अन् विद्यार्थ्याने दिली 100 रुपयांची सुपारी

Pune Daund: शिक्षकांना तक्रार केल्याचा राग डोक्यात! अन् विद्यार्थ्याने दिली 100 रुपयांची सुपारी

पुण्यातील दौंड तालुक्यात एका विद्यार्थ्याने शिक्षकांची तक्रार केल्यामुळे विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शाळेने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला, मात्र पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
Published by :
Prachi Nate
Published on

पुण्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कॉलेज, दवाखाना किंवा कोणत्याही ठिकाणी मुली सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दौंड शहरातील पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची तक्रार एका विद्यार्थीनीने शिक्षकांना केली आणि हेच त्या विद्यार्थीनेच्या जीवावर बेतलं.

नेमकं काय घडलं?

शिक्षकांना आपलं नाव सांगितल्याचा राग मनात धरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करून नंतर तिला जीवे मारण्याची सुपारी दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 100 रुपयांची सुपारी देऊन हे घृणास्पद कृत्य करण्याचा आदेश त्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली. दरम्यान त्या विद्यार्थ्याने सर्व काही त्या मुलीला सांगितले आणि तिने याबाबत तिच्या पालकांना सांगितले आणि अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षकांसह मुख्याध्यापकांकडे याबाबत तक्रार केली.

शाळेकडून प्रकार दडपण्याचा प्रयत्न

मात्र, आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून केला गेला. त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्यादी दिली आणि मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका, अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने शाळेतील मुलांची मानसिकता कुठल्या थराला गेली आहे याची चर्चा सुरू झाली असून राज्यभरात खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com