Washim: वाशिममध्ये 1 कोटी 15 लाख लंपास! 24 तासात दोन आरोपींना अटक
वाशिम गोपाल व्यास |
वाशिम शहरातील विठ्ठल कृषी मार्केटमधील 2 कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करून 1 कोटी 15 लाख रुपये लंपास केल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. याप्रकरणी तातडीने तपास करून पोलिसांनी अवघ्या 24 तासात दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. विजय गोटे आणि संजय गोटे असं अटक केलेल्या दोघा भावांचे नाव असून ते वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथील रहिवासी आहेत.
आरोपीच्या घरातून एक कोटी दोन लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून उर्वरित 13 लाख रुपये आणि आणखी काही आरोपींचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चोरीचा छडा लावण्यासाठी वाशिमसह अकोला आणि यवतमाळ इथल्याही पोलिसांच्या टीम गठित करून सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक केल्याचं सांगितल आहे.
काल भावेश बाहेती यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना, विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बायस यांना, HDFC बँकेमधून 1 कोटी रुपये आणि दुसऱ्या ठिकाणाहून 15 लाख रुपये गोळा करून मार्केटकडे आणण्याची जबाबदारी दिली होती. स्कूटरवरून परतत असताना, हिंगोली रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी रॉड आणि शस्त्रांचा वापर करून दोन्ही कर्मचाऱ्यांना गंभीर जखमी करत रोकड भरलेली पिशवी लंपास केली.