Bandra Crime : वांद्र्यातील धक्कादायक घटना, महिलेचे हात-पाय बांधून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू
वांद्रे परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सैफ अली खान हल्ल्यानंतर आता वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. वांद्रे येथील ज्या परिसरात सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला, त्याच परिसरात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून तिची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
वांद्रे परिसरातील रिक्लेमेशन डेपो परिसरातील कांचन इमारत क्रमांक 13 मधील दुसऱ्या मजल्यावरील 64 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेच्या नातेवाईकावर संशय असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलेच्या मृतदेह पाहता तिचे हात-पाय ओढणीने बांधून शस्त्राने महिलेच्या गळ्यावर वार करण्यात आल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच महिलेची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी लावली आहे. रेखा अशोक खोंडे असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्या गळ्यावर गंभीर जखमा आहे.
घरातील सर्व वस्तू व दरवाजाची पाहणी केली असता आरोपी घरात जबरदस्तीने शिरलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात महिलेच्या परिचित व्यक्तीचाच सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या माहितीच्या आधारे महिलेच्या एका नातेवाईकाला संशयावरून वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.