राजभवन येथे संपन्न होणार अभिनेत्री मधुरा वेलणकर साटमचा "मधुरव - बोरू ते ब्लॉग'चा खास प्रयोग

राजभवन येथे संपन्न होणार अभिनेत्री मधुरा वेलणकर साटमचा "मधुरव - बोरू ते ब्लॉग'चा खास प्रयोग

आपण मराठी म्हणून जन्माला आलो पण आपली मराठी भाषा कशी जन्माला आली माहित आहे?
Published by :
Siddhi Naringrekar

आपण मराठी म्हणून जन्माला आलो पण आपली मराठी भाषा कशी जन्माला आली माहित आहे? मराठी भाषेत आपली ओळख दडली आहे. आपल्या मातृभाषेविषयी गोडी निर्माण व्हायला हवी, आपल्या भाषेविषयी अभिमान असायला हवा! आपल्या भाषेचे कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार? हे असे प्रश्न मधुरव ह्या नाटकाच्या जाहिरातीतून पत्ररुपात विचारलेले आपण अनेक दिवस पाहत आहोत! आपली मातृभाषा कशी जन्माला आली, आणि कशी वाढली, कशी लढली, कशी आपल्यापर्यंत पोहोचली,कशी श्रीमंत झाली हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्या भाषेचा रंजक आणि अद्वितीय असा इतिहास संगीतमय पद्धतीने मनोरंजनातून सांगितलेला हा आगळावेगळा अनुभव आहे जो प्रत्येक मराठी माणसाने घेतलाच पाहिजे.

मधुरा वेलणकरने लिहिलेलं ‘मधुरव‘ हे पुस्तक त्यानंतर ऑनलाईन केलेला ‘मधुरव‘ हा कार्यक्रम ज्याला ‘कोविड योद्धा‘ हा पुरस्कार राज्यपालांकडून मिळाला. आणि आता त्यानंतर "मधुरव बोरु ते ब्लॉग" हा रंगभूमीवरचा कार्यक्रम. नावात साधर्म्य असलं तरी हे तीनही कार्यक्रम वेगवेगळे. मधुरा वेलणकर साटमने ३ डिसेंबरला २०२२ ला रंगभूमीवर 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' हा कार्यक्रम सुरु केला आणि अल्पावधीतच ह्या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांकडून पसंतीची पावती मिळवली. आता हा कार्यक्रम मंगळवार २४ जानेवारीला राजभवन, मुंबई येथे मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी,गायन ,नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण म्हणजे "मधुरव - बोरू ते ब्लॉग"

मधुरव - बोरू ते ब्लॉग'  ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकर ने साकारली आहे. सदर कार्यक्रमाचे संशोधन लेखन डॉ. समीरा गुजर जोशी यांचे असून नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, वेशभूषा श्वेता बापट, अंकिता जठार, नेपथ्य प्रदीप पाटील,पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, शीर्षकगीत संगीत ह्रुषिकेश रानडे, पार्श्वगायन ह्रुषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे. कलाकार म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासोबत तरुण पिढीतील नवोदित कलाकार आशिष गाडे आणि आकांक्षा गाडे, जुई भागवत आणि श्रीनाथ म्हात्रे रसिकांच्या भेटीला आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com