'गोष्ट एका पैठणीची' मधून उलगडणार सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास; ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

'गोष्ट एका पैठणीची' मधून उलगडणार सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास; ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

स्वप्न सगळेच बघतात, मात्र काहींचीच पूर्ण होतात... अशाच एका स्वप्नाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे
Published by :
Siddhi Naringrekar

स्वप्न सगळेच बघतात, मात्र काहींचीच पूर्ण होतात... अशाच एका स्वप्नाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित, लिखित 'गोष्ट एका पैठणीची'मध्ये. ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा मान मिळवलेल्या या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशा दमदार कलाकारांची मांदियाळी असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अतिशय सामान्य स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सर्वसामान्य गृहिणीचा हा असामान्य प्रवास आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही स्वप्नं असतात, कोणाची सत्यात उतरतात, कोणाची नाही. त्या स्वप्नांचा पाठपुरावा प्रत्येक जण आपापल्या परीनं करतच असतो. आपली स्वप्नपूर्ती करतानाच्या या प्रवासात अनेक अनुभव येतात, काही चांगले असतात, काही कटू आठवणी देणारे. काही अनुभवातून आपला आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. असाच एक रंजक प्रवास आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. ही गोष्ट आहे एका स्वप्नाची... ही गोष्ट आहे एका पैठणीची... एक पैठणी असावी, इतके साधे स्वप्न बाळगणारी इंद्रायणी, तिच्या स्वप्नांबाबत खूप सकारात्मक दिसत आहे. मात्र या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास खडतर दिसतोय. तिचे पैठणीचे हे स्वप्न पूर्ण होईल का, की तिचा हा प्रवास तिला एका वेगळ्या वाटेवर नेणार? या प्रश्नांची उत्तरे 'गोष्ट एका पैठणीची' पाहिल्यावरच मिळतील.

दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे म्हणतात, '' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, हे आम्ही स्वप्नातही पहिले नव्हते. आमच्यासाठी हा सुखद अनुभव होता. आम्ही सगळ्यांनीच मनापासून काम केलं होतं आणि त्याचं चीज झाल्याचं समाधान वाटतेय. ही गोष्ट आहे तुमच्या आमच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारी, ही गोष्ट आहे साध्या माणसांची,आशा- निराशेची, संस्कारांची. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांना कुठेतरी आपल्या जवळचा वाटेल. सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा हा चित्रपट आहे.''

या चित्रपटाबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ही एक भावनिक गोष्ट आहे. कधीकधी किती क्षुल्लक स्वप्नं असतात, मात्र त्या स्वप्नांपर्यंत पोहोचताना आपल्या आयुष्यात अनेक चढउतार येतात आणि त्यातूनच आपण प्रगल्भ होतो. माणसांनी स्वप्नं नक्कीच पाहावीत, कारण ती पूर्ण करण्याच्या प्रयत्नातूनच आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ गवसतो. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही 'गोष्ट एका पैठणीची'चा भव्य प्रीमिअर सिंगापूर येथे आयोजित केला होता आणि तिथला प्रेक्षकांचा प्रतिसाद भारावणारा होता. चित्रपट पाहून प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया समाधान देणाऱ्या होत्या. अशाच प्रतिक्रिया आता महाराष्टातूनही मिळाव्यात, एवढीच अपेक्षा आहे.

मंत्रा व्हिजन प्रस्तुत, अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशिओ फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाईड प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. येत्या २ डिसेंबर रोजी 'गोष्ट एका पैठणीची' महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

'गोष्ट एका पैठणीची' मधून उलगडणार सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास; ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
गोष्ट एका पैठणीची' मध्ये दिसणार स्वप्नांचा नक्षीदार प्रवास; नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com