सलमान खानला 'त्या' प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

सलमान खानला 'त्या' प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानला निर्दोष मुक्त केले.

सलमान खानला 2019 च्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी कोर्टाने बजावलेला समन्सही हायकोर्टाने रद्द केला आहे. यासोबतच मुंबई हायकोर्टाने सलमानविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेशही दिले आहेत. 2019 मध्ये एका पत्रकाराने सलमान खानविरोधात एफआयआर दाखल केली होती. पत्रकाराने अभिनेत्यावर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानला निर्दोष मुक्त केले.

नेमके काय आहे प्रकरण?

2019 मध्ये पत्रकार अशोक पांडे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांच्यावर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यानंतर पत्रकाराने अंधेरी दंडाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत पत्रकाराच्या वकिलाने नंतर सांगितले होते की, ही घटना २४ एप्रिल २०१९ च्या सकाळी घडली. अशोक पांडे सलमान खानसोबत फोटो काढत होते. यादरम्यान, अभिनेत्याच्या अंगरक्षकाने पत्रकाराचा फोन हिसकावून घेतला आणि मारहाणही केली. सलमान खाननेही आपल्याला धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनीही त्यांची तक्रार लिहून घेतली नाही, त्यानंतर पांडेंनी न्यायालयात धाव घेतली.

तक्रारदार पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सलमान खानविरोधात एफआयआर दाखल केला होता. या अंतर्गत, अभिनेत्याविरुद्ध आयपीसी कलम ३२३ (दुखापत करणे), ३९२ (दरोडा) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकावणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. आता याच प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने आज पत्रकाराने अभिनेत्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत सलमान खानला क्लीन चिट दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com