कॉमेडी किंग ओंकार भोजने पहिल्यांदाच झळकणार नायकाच्या मुख्य भूमिकेत
Admin

कॉमेडी किंग ओंकार भोजने पहिल्यांदाच झळकणार नायकाच्या मुख्य भूमिकेत

छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या  'कॉमेडी ची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि  महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या  'कॉमेडी ची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि  महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि 'अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..' या ओंकारच्या संवादाने तर समस्त प्रेक्षकांना वेड लावले. आता हाच कॉमेडी किंग लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मिती असलेल्या एका बिग बजेट मराठी चित्रपटात अभिनेता ओंकार भोजने पहिल्यांदाच मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने एका वेगळ्या अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे.

नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण पार पडले आहे.  या आगामी चित्रपटात ओंकार सोबत मराठीतील दिग्गज कलाकार असल्याचेही समोर आले आहे. 'आटपाडी नाईट्स' फेम लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे.  चित्रपटाचे पहिले शेड्यूल भोर परिसरात मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. आरती चव्हाण यांची निर्मिती असलेल्या या आगामी बिग बजेट मराठी चित्रपटाचे नाव तसेच ओंकार भोजनेसोबत कोणती नायिका झळकणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ओंकार भोजने म्हणाला की, मी आजवर टीव्ही किंवा चित्रपटात साकारलेल्या भूमिकांपेक्षा या व्यक्तिरेखेची शेड एकदम वेगळी आहे. यासोबतच मी एका गोड आणि चांगल्या अभिनेत्रीचा हिरो बनतोय याचा आनंद आहे.  या चित्रपटाचा नायक ज्या वयाचा आणि ज्या भावनिक विश्वात आहे त्याच अवस्थेत मी आहे, हे मला चित्रपटाचे नरेशन सुरू झाले तेंव्हाच जाणवले. यामुळे मी ठरवले की नितीन सर सांगतील तेवढे करयाचे कारण त्यांच्या नजरेत संपूर्ण व्यक्तिरेखा होती.  हे पात्र दिग्दर्शकाला जसे हवे होते ते साकारण्यासाठी मला संपूर्ण टीमची मदत झाली, मी एकांकिका करताना जशी एनर्जी असायची तशीच एनर्जी मला या सेटवर जाणवली यामुळे काम करताना खूप मज्जा आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com