'बहर आला'ने बहरली 'गोष्ट एका पैठणीची'

'बहर आला'ने बहरली 'गोष्ट एका पैठणीची'

एका सर्वसामान्य गृहिणीच्या स्वप्नांचा रंजक प्रवास सांगणारी कथा म्हणजे 'गोष्ट एका पैठणीची'.
Published by  :
Siddhi Naringrekar

एका सर्वसामान्य गृहिणीच्या स्वप्नांचा रंजक प्रवास सांगणारी कथा म्हणजे 'गोष्ट एका पैठणीची'. प्रत्येक स्त्रीला तिच्याकडे एखादी जरतारीची पैठणी असावी, असे मनापासून वाटते. असंच खूप सामान्य स्वप्नं बाळगणाऱ्या 'इंद्रायणीच्या आयुष्यात आलेली पैठणी तिला कसा तिला रंजक प्रवास घडवते, हे पाहायला मिळणार आहे, शंतनू गणेश रोडे लिखित, दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची' मधून. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनंतर आता संगीतप्रेमींसाठी एक सुरेल गाणे भेटीला आले आहे. 'बहर आला' असे बोल असणारे हे गाणे शंकर महादेवन यांच्या आवाजाने अधिकच बहरले आहे. सायली संजीव आणि सुव्रत जोशी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचे बोल आणि संगीत माणिक - गणेश यांचे आहेत.

गाण्यात सायलीच्या हातात तिचे स्वप्न दिसत असून त्या सत्यात उतरलेल्या स्वप्नाचा ती आनंद घेत आहे. पैठणी नेसून इंद्रायणीचे सौंदर्य बहरलेले असतानाच हे पैठणीचे उभे आडवे धागे तिच्या आयुष्यात काय गुंतागुंत आणतात, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात " गोष्ट एका पैठणीची चित्रपट आता महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी, या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या सुरेख गाण्याला शंकर महादेवन यांच्या आवाजाने चारचाँद लागले आहेत. या गाण्याची टीमच खूप मस्त आहे आणि अशी टीम एकत्र आली, तर काहीतरी अद्भुत घडणारच. या गाण्यातून अनेक भावना व्यक्त होत आहेत. प्रेम, स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद. चित्रपटाच्या कथेला साजेशे असे हे हळुवार गाणे खूपच श्रवणीय आहे.''

'गोष्ट एका पैठणीची'ची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे. तर अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com