महेश मांजरेकर अडचणीत! न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे आदेश
अभिजीत उबाळे | पंढरपूर : सिने दिग्दर्शक अभिनेता महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. माढा न्यायालायने टेभुर्णी पोलिसांना महेश मांजरेकरांविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये महेश मांजरेकर यांनी आश्रमशाळेचे संस्थाचालकास बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते व महेश मांजरेकर या दोघांच्या वाहनांमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ मागील वर्षी २०२१ साली अपघात झाला होता. सदर अपघाताप्रकरणी सातपुते यांनी मांजरेकर यांच्याविरुध्द टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या दरम्यान मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करुन प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती. त्यानुसार फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले' साथ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी या चित्रपटातील स्टारकास्टचा उलगडा करण्यात आला होता. यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अक्षयचा फर्स्ट लूकही रिलीझ करण्यात आला आहे. परंतु, यामुळे अक्षयला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. तसेच, या चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत.