Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Latest Marathi News Update live : आज मुंबईत महायुतीची पहिली तोफ धडाडणार; प्रचाराचा भव्य शुभारंभ वरळीतील NSCI डोममध्ये

Marathi Live Headlines Updates: आज शनिवार, दिनांक 0३ जानेवारी 2026, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Ladki Bahin Yojana : ऐन निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा, रखडलेल्या हप्त्यांपैकी फक्त नोव्हेंबरचा हप्ता जमा...

ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या नियोजनाअभावी लाडक्या बहिणींच्या आर्थिक अपेक्षा अधोगती झाल्या आहेत. सरकारच्या सामाजिक कल्याण योजनेअंतर्गत राखीव हप्त्यांचे वितरण वेळेवर न होण्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दोन महिन्यांचे रखडलेले हप्ते अद्याप बँक खात्यांमध्ये जमा झालेले नसताना, फक्त नोव्हेंबरचा हप्ता १५०० रुपये बुधवारी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते मिळून ४५०० रुपये जमा होण्याची अपेक्षा होती, मात्र केवळ नोव्हेंबरच्या हप्त्यामुळे अनेक महिला आर्थिक दृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. या विलंबामुळे घरगुती खर्च, बालवाढीशी संबंधित गरजा आणि इतर मूलभूत खर्च भागवणे अवघड झाले आहे.

Gold-Silver Price Update : सोन्या – चांदीच्या दराने पुन्हा घेतली झेप; 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

भारताच्या सोन्या आणि चांदीच्या बाजारात 3 जानेवारी रोजी किंमतीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. यामुळे सोन्या आणि चांदी खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना नवीन दर लक्षात ठेवणे गरजेचे ठरले आहे. हवामानाच्या अस्थिरतेसह जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 13,621 रुपये झाला असून, 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 12,486 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 10,216 रुपये नोंदवला गेला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,24,860 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,36,210 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,02,160 रुपये आहे.

Invest Maharashtra : राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी सरकारचं मोठं पाऊल .... नवीन उद्योग धोरणात ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’सह ‘कंट्री डेस्क’ची घोषणा

महाराष्ट्र सरकारने राज्याची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलर वर पोहोचवण्याचा महत्वाकांक्षी उद्देश ठरविला आहे. यासाठी थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणे अनिवार्य असल्याचे सरकारने सांगितले आहे. या उद्देशाने नव्याने जाहीर करण्यात आलेल्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरणमध्ये ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या डिजिटल मंचाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच जागतिक पातळीवरील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी ‘कंट्री डेस्क’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ravindra Chavan : कोल्हापूरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत शुभारंभ 

(Ravindra Chavan) 29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होणार असून शंखनाद विजयाचा हे घोषवाक्य घेऊन आज कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला जाणार आहे.

Election Duty : मयत शिक्षकांना निवडणूक ड्युटी; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर शिक्षक संघटना संतापली

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, दोन मयत शिक्षकांना निवडणूक ड्युटीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे शिक्षक वर्गात तीव्र संतापाची भावना असून, प्रशासनाच्या गोंधळलेल्या कारभारावर जोरदार टीका होत आहे. निवडणूक कामकाजासाठी गैरहजर राहणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, याच प्रक्रियेत दोन शिक्षकांचा मृत्यू झालेला असतानाही त्यांच्या नावावर ड्युटी लावण्यात आली आणि त्यांना गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Uday Samant : पुण्यात शिवसेनेच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ; उदय सामंतांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात होणार

(Eknath Shinde) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात शिवसेनेच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ होणार असून उदय सामंत यांच्या उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात होणार आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 9 जानेवारीला भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Municipal Elections : महापालिका निवडणूक; आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार

( Maharashtra Municipal Elections) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. काल अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Devendra Fadnavis : फडणवीस सरकारची लाखो शेतकऱ्यांना नववर्षाची मोठी भेट...

नववर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

Mahayuti : आज मुंबईत महायुतीची पहिली तोफ धडाडणार; प्रचाराचा भव्य शुभारंभ वरळीतील NSCI डोममध्ये

मुंबईतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, आज महायुतीकडून निवडणूक प्रचाराची अधिकृत सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती आज मुंबईत आपली पहिली प्रचारसभा घेणार असून, या सभेमुळे राजकीय रणधुमाळीला औपचारिक प्रारंभ होणार आहे. वरळी येथील NSCI डोममध्ये होणाऱ्या या भव्य सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी इचलकरंजी दौऱ्यावर

आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात..इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुती उमेदवारांच्या प्रचार प्रारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वस्त्रनगरीत येत आहेत. आज शनिवारी दुपारी २ वाजता मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे, आज दुपारी 2 वाजता राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळून देवेन्द्र फडणवीस यांचा रोड शो सुरु होईल. त्यानंतर शिवतीर्थ, शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक या मार्गावर हा रोड शो होणार आहे. त्याच ठिकाणी या रोड शोची सांगत होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com