Bharat Bandh: 12 फेब्रुवारीला ‘भारत बंद’ची हाक; शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांबाबत संभ्रम
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
देशातील विविध कामगार, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी 12 फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले असून, या बंदचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी होणाऱ्या या देशव्यापी संपात 10 केंद्रीय ट्रेड युनियन सहभागी होत असून, नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापार करार, मनरेगातील बदल आणि अन्य धोरणांविरोधात ही हाक देण्यात आली आहे.
INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU,j LPF आणि UTUC या संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नव्या लेबर कोडमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येईल, नोकरीची सुरक्षितता कमी होईल आणि खासगीकरणाला चालना मिळेल, असा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि रोजगार हमी योजनांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
चार नवीन कामगार कायदे रद्द करावेत, प्रस्तावित विधेयके मागे घ्यावीत आणि मनरेगा अधिक बळकट करावी, अशा प्रमुख मागण्या या संपामागे आहेत. ‘विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण) अधिनियम 2025’ रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
काय राहणार बंद?
12 फेब्रुवारीला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँक किंवा संबंधित बँकांकडून अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी बँक सेवा अंशतः सुरू राहू शकतात.सरकारी कार्यालयांवरही या संपाचा परिणाम दिसू शकतो. विशेषतः ज्या राज्यांत संघटनांचा प्रभाव अधिक आहे, त्या ठिकाणी कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शाळा-महाविद्यालये सुरू की बंद?
देशभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही. मात्र, केरळ, कर्नाटक आणि ओडिशा यांसारख्या राज्यांत सार्वजनिक वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असल्याने काही शैक्षणिक संस्था स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. एकंदरीत, ‘भारत बंद’चा प्रभाव राज्यनिहाय वेगवेगळा असू शकतो. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
१२ फेब्रुवारी देशव्यापी भारत बंदची हाक
नवीन कामगार कायदे, मनरेगा आणि रोजगार हमी योजना विरोधातील आंदोलन
बँका, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता
शाळा-महाविद्यालये स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात
