CM Devendra Fadnavis: अजित पवार यांच्या अपघाताच्या संशयाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून चौकशी करण्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “चौकशी पूर्ण होऊ द्या, देशातील तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवण्याचे कारण नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
फडणवीस म्हणाले की, रोहित पवार यांनी नेमके काय वक्तव्य केले, हे त्यांनी संपूर्ण ऐकलेले नाही. मात्र विविध माध्यमांतून समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी काही मुद्दे आणि शंका मांडल्या आहेत. “अजित दादा पवार हे महाराष्ट्राचे लाडके आणि ज्येष्ठ नेतृत्व होते. त्यांच्या अपघाताची सखोल व पारदर्शक चौकशी व्हावी, ही मागणी चुकीची नाही,” असे ते म्हणाले.
याच मागणीसाठी आपण स्वतः केंद्र सरकारला पत्र लिहिले होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केल्याचे पत्रही पाठवले आहे. सध्या डीजीसीए (नागरी उड्डाण महासंचालनालय) तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. ब्लॅक बॉक्स सापडला असून, विमानाचे अवशेष आणि आवश्यक नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. पायलट आणि एटीसीमधील संवादाचे डिजिटल रेकॉर्डही तपासासाठी उपलब्ध आहेत.
“डीजीसीए ही देशातील सर्वोच्च तपास संस्था आहे. यापूर्वी झालेल्या सर्व विमान अपघातांची चौकशी त्यांनीच केली आहे. अनेक देशांमध्ये भारतीय तज्ज्ञांना चौकशीसाठी निमंत्रित केले जाते. त्यामुळे आपल्या यंत्रणांवर अविश्वास दाखवणे योग्य नाही,” असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
भावनिक वातावरणात काही विधाने केली जात असतील, असे नमूद करत त्यांनी सांगितले की, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तर्कवितर्क लावल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. जर कोणाकडे ठोस मुद्दे किंवा शंका असतील, तर ते अधिकृतरीत्या डीजीसीएकडे पाठवावेत.
“अजित दादांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण होऊ नये. सत्य निश्चितपणे समोर येईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अजित पवार अपघातप्रकरणी आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी
मुख्यमंत्री फडणवीस यांची देशातील यंत्रणांवर विश्वास व्यक्त
डीजीसीएकडून सखोल तपास, ब्लॅक बॉक्स जप्त
अपघाताचे राजकारण टाळण्याचे आवाहन
