मार्गशीर्षमधील गुरूवारच्या महालक्ष्मी व्रताच्या तारखा जाणून घ्या

मार्गशीर्षमधील गुरूवारच्या महालक्ष्मी व्रताच्या तारखा जाणून घ्या

मार्गशीर्षमधील गुरूवारी अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात. या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते.
Published by :
Siddhi Naringrekar

मार्गशीर्षमधील गुरूवारी अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात. या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते. या मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये प्रत्येक गुरूवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपास धरतात. एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. एकूण चार गुरूवारी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केलं जातं. लक्ष्मी मातेची पुजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो. मार्गशीर्षातल्या गुरूवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. सुद्धा शेजारपाजारच्या सवाष्ण स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो.

मार्गशीर्ष गुरूवार व्रतासाठी घट मांडणी कशी करावी ?

पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चारहीबाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कळश ठेवावा. कळशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे. कळशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. त्यापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.

पूजा कशी करावी ?

लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी. देवीला कमळाचे फूल अर्पित करावे. लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी. श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे. गायीसाठी एक पान वेगळं काढावे. दुसर्‍या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्या झाडाला घालावे. यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दुध आणि फळांचे सेवन करावे, या दिवसात घरात मांसाहार करू नये. दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा, फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी.

मार्गशीर्ष गुरूवार 2022 व्रत तारखा

पहिला गुरूवार - 24 नोव्हेंबर

दुसरा गुरूवार - 1 डिसेंबर

तिसरा गुरूवार - 8 डिसेंबर

चौथा गुरूवार - 15 डिसेंबर

पाचवा गुरूवार - 22 डिसेंबर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com