Teachers Day 2024: ...म्हणून 5 सप्टेंबरला 'शिक्षक दिन' साजरा केला जातो
आजची पिढी म्हणजे उद्याचं देशाचं भवितव्य असते. हे देशाचं भवितव्य घडविण्याकरिता शिक्षक विद्यार्थ्यांची जडणघडण करतात. तसेच नीतिमत्तेसारखी अत्यावश्यक मूल्ये रूजविण्याकरिता सदैव कार्यरत असतात. एकप्रकारे आदर्श नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. ‘शिक्षकांचे सक्षमीकरण: लवचिकता मजबूत करणे, टिकाऊपणा निर्माण करणे’ ही यंदाची शिक्षक दिनाची संकल्पना आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या काही विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हा राधाकृष्णन यांनी माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून पाळला तर हा मला अभिमान वाटेल, असे सांगितलं. डॉ. राधाकृष्ण यांच्या सूचनेनुसार 5 सप्टेंबर 1962 रोजी देशात पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून राधाकृष्णन यांची जयंती हा शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.
शिक्षक म्हणजे नेमकं काय?
शि म्हणजे शिल
क्ष म्हणजे क्षमा
क म्हणजे कला
ज्याच्याकडे शिल, क्षमा आणि कला याचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक.
या दिवशी विद्यार्थी शिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करतात. तसेच आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो.