अन्नत्याग आंदोलन
अन्नत्याग आंदोलन Team Lokshahi

साहेबराव, मालती करपे आणि चार चिमुकल्यांचे आत्महत्येमागील वास्तव....

40 एकर शेतीचा मालक असलेला साहेबराव करपे हा सहकुटुंब आत्महत्येच्या निर्णयाप्रत का आला, या प्रश्नाने संवेदनशील मनांना अस्वस्थ करून सोडले होते.
Published by :
Team Lokshahi

▪️ सुदर्शन रापतवार/अंबाजोगाई

वर्धा - चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव पाटील करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी पत्नी मालती व चार मुलांसह दत्तपूर (वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या घटनेला रविवारी (ता. 19) 35 वर्षे पूर्ण होत आहेत.

साहेबराव,मालती आणि त्यांच्या चार चिमुकल्यांच्या सामुहिक आत्महत्येची बातमी २९ मार्च ला सकाळच्या सुर्यकिरणांसोबत राज्यातील प्रत्येक गावागावात पोहंचली. तशी ही बातमी दत्तपुर पासून जवळच असलेल्या वरुडजि. यवतमाळ येथील शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यां शेतकरी संघटनेच्या नेत्या सुमनताई अग्रवाल यांच्यापर्यंत ही पोहोचली.

वर्धा जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी असलेल्या शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या सुमनताई अग्रवाल यांनी 20 मार्च 1986 रोजी सकाळीच तातडीने आपले पती राधेश्याम अग्रवाल यांना सोबत घेऊन दत्तपुर येथील कुष्ठरोग धाम गाठले. पोलीस पोहोचण्यापूर्वी त्या तिथे पोहचल्या, सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती त्यांनी गोळा केली आणि या संदर्भात काही महत्त्वपुर्ण टिपण्णी ही लिहील्या.

आपल्या टिपण्णी मध्ये सुमनताई अग्रवाल यांनी अनेक महत्वपूर्ण नोंदी केल्या आहेत. आपल्या टिपण्णीत त्या म्हणतात, "40 एकर शेतीचा मालक असलेला साहेबराव करपे हा सहकुटुंब आत्महत्येच्या निर्णयाप्रत का आला, या प्रश्नाने संवेदनशील मनांना अस्वस्थ करून सोडले होते. या घटनेनंतर राज्यात शेतकरी आत्महत्यांची जी साखळी सुरु झाली, ती आज पर्यंत अव्याहतपणे सुरु आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकऱ्यांसाठी काही तरी करेल, असा आशावाद साहेबराव करपे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नोंदवला होता. पण तो आशावाद प्रत्यक्षात आला का? याचे उत्तर मात्र दुर्दैवाने अजूनही होकारात आलेले नाही.

चिलगव्हाण या गावचे सतत 11 वर्षे सरपंच राहिलेले, संगीत विशारद असलेले, उत्तम भजन गाणारे साहेबराव करपे यांचा गावात मोठा वाडा; पण भग्नावस्थेत. त्या वाड्यातच त्यांचा संसार होता. थकीत बिलापोटी १९८६ च्या मार्च पुर्वीच एमएसईबीने त्यांच्या शेतातील वीजजोडणी थकीत बीलामुळे खंडित केली. 40 पैकी 15 एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू, चणा या पिकांना पाणी न मिळाल्याने वाळला अन् सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते सैरभैर झाले. मनाने खचून गेलेल्या साहेबराव करपे आणि त्यांची पत्नी मालती यांनी काहीतरी मनाशी ठरवले व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी, 20 मार्च 1986 ला सकाळी जेंव्हा सुमनताई अग्रवाल आणि त्यांचे पती राधेश्याम अग्रवाल जेंव्हा वर्धा जिल्हा रुग्णालयात गेले तेंव्हा तिथे साहेबरावांचे वृद्ध आणि पायाने अधू असलेले वडील आणि गावातील चारपाच लोक आले होते. शवचिकित्सेनंतर त्यांनी एका ट्रकने सहाही मृतदेह चिलगव्हाण येथे नेले. या सहा ही जणांवर त्याच दिवशी सायंकाळी सामुहिक अंत्यसंस्कार झाले. आपल्या आत्महत्येने सिस्टीम हालेल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे काही न घडले नाही. उलट तेंव्हापासून आजपर्यंत शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र काळवंडून गेला आहे."

साहेबराव करपे, मालती करपे त्यांची चार मुलं यांनी केलेल्या सामुहिक आत्महत्येला 19 मार्च रोजी 35 वर्षे पुर्ण होतात. या सामुहिक आत्महत्येची नोंद शासन दरबारी पहिली शेतकरी आत्माहत्या अशी केली गेली. या आत्महत्येनंतर सुरु झालेले शेतकरी आत्महत्यांचे चक्र आजही सतत सुरूच आहे. या मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ ही झालेली आहे. या सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी सात वर्षांपूर्वी हे अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. देशभरातील शेतकरी आत्महत्या या शेतकऱ्यांविरोधी कायदे असल्यामुळेच होतात असे एका अभ्यासाअंती लक्षात आले असल्यामुळे शेतकऱ्यांना जाचक ठरणारे तीन नरभक्षक कायदे रद्द करण्यात यावेत म्हणून किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली सात वर्षांपासून 19 मार्च रोजी देशभरात अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. यावर्षी याआंदोलनाचे सातवे वर्षे आहे. हे आंदोलन आता देशभरापुरतेच मर्यादित राहिले नाही तर विदेशात गेलेले अनेक किसान पुत्र किसानपुत्री या आंदोलनात सहभागी होत आहेत. आपण ही आंदोलनात सहभाग घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहानुभूती व्यक्त करायलाच पाहिजे, नाही का?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com