Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती; शिवभक्तांना द्या 'या' खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती; शिवभक्तांना द्या 'या' खास शुभेच्छा

शिवजयंतीचा सोहळा हा प्रत्येक शिवभक्तासाठी खास असतो. आज म्हणजेच 28 मार्च या दिवशी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शिवजयंतीचा सोहळा हा प्रत्येक शिवभक्तासाठी खास असतो. आज म्हणजेच 28 मार्च या दिवशी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारकडून 19 फेब्रुवारी या दिवशी दरवर्षी तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंतीनिमित्ताने राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. पण काही शिवभक्त तिथीनुसार देखील शिवजयंती साजरी करतात. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया दिवशीचा असल्याने यंदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा 28 मार्च 2024 या दिवशी साजरा केला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, तेव्हा कालगणना ही हिंदू पद्धतीनुसार सुरू होती. म्हणूनच काही लोक इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारीला, तर काही लोक तिथीनुसार अर्थात फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया दिवशी देखील शिवजयंती साजरी करतात. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्याची सुरुवात 1869 साली करण्यात आली. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला आणि शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली असे सांगितले जाते. नंतर 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव म्हणून सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.

शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत. त्यानुसार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस अर्थात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 Wishes In Marathi:

1. जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला,

तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज,

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,

राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती...

2. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा...

3. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत

व स्फूर्ति स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी

राजे यांना मनाचा मुजरा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com