जगात सहिष्णुता कमी होत असल्याने माझं मन विषण्ण, अस्वस्थ

जगात सहिष्णुता कमी होत असल्याने माझं मन विषण्ण, अस्वस्थ

विश्व साहित्य संमेलनात श्रोता म्हणून उपस्थित राहावे म्हणून मी गेल्या वर्षी मालदीवला येण्याची इच्छा व्यक्त केली.
Published by :
Sagar Pradhan

सातव्या ‘शब्द विश्व मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर - पुसद, संमेलनाच्या उद्घाटक श्रीमती चंद्रकला बेलसरे, उपसंपादक चपराक-पुणे, मुख्य अतिथी व श्रीलंका येथे झालेल्या ‘शब्द विश्व मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष, ज्येष्ठ गझलकार मित्रवर्य सिद्धार्थ भगत, शब्द परिवाराचे मुख्य माझे स्नेही मित्र संजय सिंगलवार, लेखिका व उपाध्यक्ष शब्द परिवार शशी डंभारे, मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ सतीश बोरुळकर, डॉ. राजेंद्र राठोड, वैद्यकीय अधिकारी एसआरपी, मुंबई, श्रीमती कमलताई थोरवे, प्रमुख पुणे जिल्हा महिला शिवसेना, श्रीमती फरजाना डांगे, माजी सदस्य, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई, प्रा. डॉ. अनिल काळबांडे, उमरखेड, उपस्थित सर्व साहित्यिक, साहित्यप्रेमी मित्रांनो.

(गेली अनेक वर्षे माझा व संजय यांचा स्नेह आहे. राजन खान यांच्या खिंगर, पाचगणी येथील "आपण संमेलन" यात पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर आमची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. आज पुन्हा नेपाळ येथे भेटत आहोत हा आनंद आहे. खिंगरपासूनची आमची मैत्री आजही कायम आहे. विश्व साहित्य संमेलनात श्रोता म्हणून उपस्थित राहावे म्हणून मी गेल्या वर्षी मालदीवला येण्याची इच्छा व्यक्त केली. पण नंतर माझ्या अडचणीमुळे येऊ शकलो नव्हतो. यावर्षी त्यांचा फोन आला. यंदा शब्द संमेलन नेपाळला आहे. जमले तर या. मी नक्की येतो म्हणालो. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. मी म्हणालो यावर्षी अध्यक्ष कोण आहे ? मला उत्सुकता होती की आपला कोणी मित्र अध्यक्ष असणार. तो म्हणाला मी अध्यक्षांशी बोलतोय. मी म्हटलं, नंतर बोलतो. तू त्यांना बोलून घे. तो म्हणाला, नाही मी अध्यक्षांशी बोलत आहे. मी म्हटलं नाव तरी सांग ना ? तिकडून आवाज आला, मी नियोजित अध्यक्षांशीच बोलत आहे. असं म्हटल्यावर मी हवेतच उडालो. क्षणभर शांत झालो. असा सुखद धक्का संजयने दिला. मी संमती दिली आणि त्याने फेसबुकवर माझ्या नावाची घोषणा करणारी पोस्ट टाकून सर्वांनाच धक्का दिला.)

शब्द परिवार आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल संजय सिंगलवार यांचा व शब्द परिवाराचा मनोमन आभारी आहे. यापूर्वीचे अध्यक्ष तोलामोलाचे लेखक, कवी, गझलकार व पत्रकार आहेत. त्या तुलनेने मी साधा कार्यकर्ता. रसिक, श्रोता. कवितालेखन, प्रासंगिक लेखन, व्यक्तिचरित्र लेखन केलेला आहे. 'पांगलेल्या प्रार्थना' हा कवितासंग्रह आणि 'राहून गेलेली पत्रे' हा ललितबंध प्रकाशित आहे. 'उगवतीचे रंग' आणि 'ऋतू शब्दांचे' या कवितासंग्रहाचे संपादन केले आहे.

पण, मुळात मी कार्यकर्ता आहे. गेली ४५ वर्षे हे काम करतो आहे. प्रसंग कोणताही असो धावून जाणे, मदत करणे, आयोजन करणे, आयोजनात मदत करणे, आस्वाद घेणे, ग्रहण करणे हा माझा स्थायीभाव आहे. प्रवास करणे, मित्र बनविणे ते कायम टिकविणे व भेटेल त्यांचा स्नेह जतन करणे हाही माझा स्थायीभाव आहे.

हे विश्व संमेलन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्या गावातून मी आलो ते माझे प्रिय गाव अंबाजोगाई. आद्यकवी स्वामी मुकुंदराज, सर्वज्ञ दासोपंत व थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्य व कर्तृत्वाने पावन झालेल्या अंबाजोगाईच्या भूमीतून मी आलो आहे. हे माझे भाग्य पण आहे.

जगात आणि देशात जी उलथापालथ चालू आहे त्या पार्श्वभूमीवर याला मी अत्यंत महत्त्वाचे स्थान मानतो. जगात सहिष्णुता कमी होत असल्याने माझं मन विषण्ण, अस्वस्थ आहे. जात, धर्म, पंथ, भाषा, राज्यांचा सीमावाद, देशांचा सीमावाद, त्यांचे विखारी प्रश्न, त्यातून होणाऱ्या दंगली, हाणामाऱ्या, युद्ध, दहशतवाद यामुळे सामान्य माणूस, ज्याला शांतता हवी आहे तो भरडला जात आहे. त्यामुळेही मी अस्वस्थ आहे. माणसाच्या खऱ्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे विषारी विळखा त्याच्याभोवती फास घेऊन उभा आहे. ज्या बुद्धाने, येशूने, महावीराने, महान संतांनी, महान मानवाने मानवतेचा धर्म सांगितला, त्याकडे नेमके दुर्लक्ष होताना आपण पाहतो आहोत. सुख व शांती कशात आहे याचा विसरच जणू पडला आहे. दंगली व युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणारे आबालवृद्ध यांच्या करूण कहाण्या व वास्तव अंतर्मुख करताक. पण 'रक्ताला चटावलेले' त्याकडे दुर्लक्ष करणारच हे सत्य आहे. म्हणून वेगवेगळ्या देशात ही संमेलनं होतात, तिथल्या परिस्थितीचे अवलोकन होते. समस्यांची जाणीव होते. हे महत्त्वाचे मानतो. ज्या देशात शांतीदूत गौतम बुद्धांचा जन्म झाला त्याच देशात आणि पवित्र जन्मभूमी लुंबिनी येथे संमेलन होत आहे. त्या पवित्र भूमीत शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मला मिळाला यासारख्या दुसरा सन्मान नाही. याबाबत स्वतःला भाग्यवान समजतो. म्हणून अनेक अर्थाने संमेलनाला महत्त्व देतो.

जग झपाट्याने बदलत आहे. खुल्या बाजारपेठेमुळे माणसांचे स्थलांतर होत आहे. शिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून स्थलांतर होत आहे. मराठी माणूसही अटकेपार जात आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस पोहचला आहे. पण आपली भाषा, संस्कृती, खाद्य व वस्त्रसंस्कृतीची त्याला ओढ असतेच. त्यांना मातृभूमीबद्दल प्रेम असते. अशा वेगवेगळ्या देशात संमेलने होणे त्यांना बळ देऊ शकते. छोटी संमेलने फार आपुलकीने घेतली जातात व त्यात अनेक गुणवंत, गुणी कलावंत, लेखक यांना संधी मिळते.

मराठी भाषा व साहित्याची वृद्धी व्हावी यासाठी शासन, साहित्य संस्था व अभ्यासक प्रयत्नशील आहेत. लेखक, कवी, संशोधक, अभ्यासक सतत काम करीत आहेत. परंतु राजकारण राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाही. साहित्य, संगीत, कला, शिक्षण, भाषा क्षेत्रात त्याचा शिरकाव वाढला आहे. या क्षेत्रातील गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारांची सद्दी चालू आहे. प्रामाणिक माणूस, लेखक, कलावंत तिकडे फिरकत नाही. मराठी भाषेच्या साहित्य संस्था याही गुणवंतांची पारख करण्याचे सोडून आपलं कोण आहे? यात गुंतल्यामूळे साहित्य संमेलने, पुरस्कार किंवा अन्य बाबीकडे रसिक व श्रोत्यांचा नाराजीचा स्वर कानावर पडतो आहे. त्यामुळे 'राजकारण आणि आपलं कोण' या बाहेर येऊन साहित्य संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे लक्ष घालावे असे मला वाटते. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत जो आदर्श घालून दिला त्याला तिलांजली दिली जात आहे असे मला वाटते, त्यांचा आदर्श आजही घ्यावा असाच

आहे. पण आपल्याला त्यांच्याशी कांहीं देणंघेणं नाही असा समज राजकीय लोकांचा झालेला दिसतो आहे.

हेच राजकारणाचे झाले आहे. सुमारांची सद्दी, अपरिपक्कव नेतृत्व व विचारशून्य राजकारणामुळे सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांना मूठमाती दिली जात आहे. पक्षीय राजकारण ही विचारांची लढाई असते. त्यात सत्तासंघर्ष हा पराकोटीचा एकतर्फी झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. सत्ता विकासाचे हत्यार आहे हे विसरून त्यात पैसा आहे, मौजमजा आहे ही वृत्ती प्रबळ झाली आहे. परिस्थिती तशीच आहे. ही बाब मुळातच काळजी करणारी आहे. स्वातंत्र्य काळानंतर कांही काळच लोक प्रामाणिकपणे काम करीत राहिले. १९८० च्या नंतर राजकारणाची घसरण झाली. त्यात जात, धर्माचे भांडवल घुसडले. आज राजकारण व राजकीय विचारांची दशा झाली आहे. याबद्दल कोणी बोलू नये म्हणून संविधानाचा गैरवापर करून अनैतिक दहशत निर्माण केली गेली. संस्कृतीच्या ठेकेदार असलेल्या पक्षाने तर नीतिमत्ता कायमची गहाण ठेवली आहे. इंदिराजींची आणीबाणी दिसणारी होती. आताची आणीबाणी अदृश्यपणे राबविली जात आहे. कोणी बोलणारा असेल तर त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकून टाकायचे किंवा भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून, आमिष दाखवून सत्ता स्थापन करण्याची निर्लज्ज काम स्वतःला संस्कृतीचे ठेकेदार समजणाऱ्या राजकीय संस्था करीत आहेत. त्यातून भारतीय सभ्यतेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या मंडळींकडून धार्मिक उन्माद माजवून राजकीय पोळी भाजून घेतली जात आहे. हा चिंतेचा विषय नक्कीच आहे. लेखक व कलावंत यांनी दिशा दाखविण्याची गरज आहे. साहित्य, शिक्षण व कला हाच एकमेव मार्ग असा आहे की तो चिरकाल टिकून राहतो व जग त्यावर मार्गक्रमण करीत असते.

जगात वेगवेगळ्या पद्धतीचे लेखन विपुल आहे. मराठी साहित्यात व भारतातील वेगवेगळ्या भाषांतील साहित्यातही विपुल लेखन आहे. कविता, कथा, कादंबऱ्या, ललित, प्रवासवर्णने, आत्मकथन, चरित्र लेखन, वैचारिक लेखन, समीक्षात्मक लेखन, स्त्रीवादी लेखन, दलित साहित्य, संत साहित्य, ग्रामीण साहित्य असे वैविध्यपूर्ण लेखन आहे. पूर्वी वृत्तपत्रे, साहित्यविषयक मासिके, साप्ताहिके किंवा अन्य ठिकाणी हे साहित्य प्रसिद्ध व्हायचे. प्रकाशन संस्था पुस्तके प्रकाशित करायच्या. सध्या नवतंत्रज्ञान घरोघरी पोहचले आहे. फेसबुक, वॉटसॲप, इमेल, ब्लॉगद्वारे ते वाचकांना वाचण्यास उपलब्ध आहे. सहज सुचणारे तिथे व्यक्त होतात. या लेखनाचा दर्जा काय ? हा विचार करायला भाग पडणारा प्रश्न असला तरी प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला प्रकटण्याची सहज संधी मिळाली आहे. त्यातून खूप प्रतिभावंत लेखक, कवी, कथाकार, ललित साहित्य लिहिणारे सर्जक समोर आले आहेत, हेही नाकारता येत नाही. त्याचा दर्जा समीक्षकांनी ठरवायचा आहे. तो त्यांनी तपासावा.

अलीकडे कांही नवलेखकांना लवकर 'लेखक-कवी' म्हणून मान्यता हवी असते. आपली पुस्तके प्रसिद्ध व्हावे असे वाटते. कुठल्या तरी प्रकाशकाकडे ते साहित्य घेऊन पुस्तके प्रकाशित करण्याचा घाट घालतात. कोणी नसेल तर स्वतः प्रकाशक होतात आणि भराभर पुस्तके प्रकाशित करतात. हे लोक पुरस्काराच्या मागे लागतात. अलीकडे मी तुला, तू मला असा देवाणघेवाणीचा प्रकार दिसतो. यापासून लेखकांनी सावध रहावे. पुरस्कार म्हणजे कवी - लेखकाला मान्यता हा समज या तथाकथित लेखक, कवींचा झाला आहे. तो समज काढून टाकणे कठीण आहे. पण तसे प्रयत्न करणे जरुरी आहे.

साहित्यमूल्यांची चिकित्सा करुन शासन वा साहित्य संस्थांनी पुरस्कार घोषित करावे. पुरस्कारासाठी अर्ज मागवून घेणे हा लेखकांचा अपमान आहे असे मी मानतो. संबंधितांनी पुस्तके विकत घेऊन वा प्रकाशकांकडून मागवून मूल्यमापन करून योग्य कवी, लेखकास पुरस्कार द्यावेत. तसे झाले तरच तो साहित्यिक, कलावंत यांचा खरा सन्मान ठरेल. सरकारचे पुरस्कार देणारे राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, भाषा मंडळ, पुरस्कार समिती यावर कुठल्या दर्जाचे सदस्य जातात हे मंडळावर गेलेल्या सदस्यांची नुसती यादी जरी आपण पाहिली तरी कळेल. वकुब नसलेल्या काही व्यक्ती दिसतील. मला त्याचे दुःखही होते आणि चिंताही वाटते. काही लेखक-कवी पुढाऱ्यांचे, मंत्र्याचे, आमदार, खासदार, अधिकारी यांचे मांडलिकत्व पत्करतात आणि लाचार होऊन राजकीय वा अधिकारी वर्गाच्या ताटाखालचे मांजर बनतात. ही लाजिरवाणी बाब आहे, हे सांगताना मला संकोच वाटत नाही. स्वाभिमानशून्य लोक समाज नासवतात. मग ते लोक कुठल्याही क्षेत्रातील असोत. त्यांना भविष्याची चिंता नसते. अल्पसंतुष्टी, अविवेकी लोक समाजासाठी घातक असतात. अशा लोकांपासून सावध राहणे हेच ठीक असते. त्याची पात्रता दाखविण्याची हिंमत आपण बाळगली पाहिजे. सुमारांची सद्दी सर्वत्र सुरू आहे. ती साहित्य क्षेत्रात येऊ न देण्याचे भान ठेवले पाहिजेच. तरच साहित्याचा व साहित्यिकांचा दर्जा टिकून राहील.

हीच परिस्थिती दूरचित्रवाहिन्यांची आहे. मालिकांचे विषय, संवाद-पटकथा लेखन खरंच अस्सल आहे का ? निर्मात्याला हवे तसे लेखन करणारे लेखक हे खरंच लेखक आहेत का ? सवंग लोकप्रियता आणि अर्थार्जनासाठी सवंग कथा लिहून मालिका तयार करतात. त्यामुळे त्यांच्या दर्जाबद्दल प्रश्न पडतात. ही बाब प्रेक्षकांना सहज लक्षात येते. अशा लेखनाचा व मालिकांचा भडिमार अहोरात्र सुरू आहे. त्याचे दृश्य दुष्परिणाम भविष्यात समाजाला भेडसावतील.

ग्रामीण जीवनावर बरेच साहित्य आहे. शेतकरी, गावगाडा, नात्यागोत्यांची, दुःख व दारिद्र्याची भरपूर चर्चा ग्रामीण साहित्यात आढळते. शेतकरी, शेती आणि त्यांच्या अर्थार्जनाबाबत नव्याने मांडणी करावी लागणार आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आज अन्नधान्य उत्पादन करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी आर्थिक विळख्यात अडकला आहे. कधी बाजारभाव मिळत नाहीत, कधी पाऊस दगा देतो तर कधी अतिवृष्टीत सगळे वाहून जाते. नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. देशात व राज्यात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे खूप दुःखद आहे पण कोणताही सत्ताधाऱ्यांना ना याची खंत ना कांहीं शरम. रोज शेतकरी मरतोच आहे त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्याला दरमहा पेन्शन मिळणे आवश्यक आहे. शासनाने त्यात लक्ष घालून उपाययोजना आखल्या पाहिजेत. जगात कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञानयुक्त शेतीसाठी केंद्र व राज्य सरकारने सहाय्य करावे.

जागतिक हवामान बदल चिंतेचा विषय आहे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूंचे वेळापत्रक बदलत आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होते आहे. मानवीय पातळीवर जागतिक तापमानाचे आरिष्ट आले. उत्तराखंडात बर्फ वितळून आलेला प्रलय आपण अनुभवला आहे. मनुष्य व निसर्गाची हानी होत आहे. जोशीमठ व अन्य ठिकाणी सततचे भूस्खलन त्याचेच उदाहरण आहे. वेगवेगळ्या साथीच्या प्रादुर्भावाने जगाची हानी झाली आहे. कोविडमुळे अख्खे जग एकाजागी स्तब्ध झाले होते. या विश्व साहित्य संमेलनात भाषा, साहित्यासोबत माणसाच्या जगण्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे असे कळकळीने वाटते. खाजगीकरणातून देश सुधारेल हे मनाला पटत नाही. पण दुर्दैवाने अनेक बाबींचे खाजगीकरण होत आहे त्यांच्या परिणामांची चिंता कुणालाच नाही हे निषेधार्य आहे. खाजगीकरण यातून गुणवत्ता येईल की मग्रुरी हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. या सगळ्या बाबींचा मराठी माणूस, लेखक, कलावंत यांच्याही जगण्यावर परिणाम होणारच आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीतून मांडले जाईल ही अपेक्षा.

शेवटच्या मुद्याकडे येतो. मराठी भाषा जतनासाठी दीर्घकालीन धोरण ठरविण्याचा गरज आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या साध्या निर्णयाचीही अंमलबजावणी होत नाही. मराठी शाळा ओस पडत आहेत. महानगरात मराठी माध्यमांच्या शाळा टिकविण्याची आणि त्यांचा दर्जा उंचाविण्याची जबाबदारी शासन आणि मराठी माणसांची आहे. मराठी भाषेवर इंग्रजी, हिंदी भाषांचा उत्तरोत्तर अधिक प्रभाव पडत आहे. त्यातून आपण मराठीचे सकल रूप टिकविणे आव्हानात्मक ठरत आहे. भाषेच्या मुद्द्यावर तरी ठोस उपाय सूचविण्याची जबाबदारी लेखकांची आहे.

मला शब्द परिवाराने सन्मानाने या सातव्या शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी माझी अनपेक्षित निवड केली. त्याचा मी स्वीकार केला. मला, कुटुंबाला, अंबाजोगाईकर यांना, मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम लेखक, कवी, कलावंत, मित्र व चाहते यांना खूप आनंद झाला, माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, स्वागत झाले. त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. हे प्रेम असेच कायम राहुद्या. शब्द परिवार, संजय सिंगलवार, लेखिका शशी डंभारे व आपण उपस्थित रसिक, लेखक, कवी, कलावंत, पत्रकार यांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद!

मूंशी प्रेमचंद यांच्या कवितेचा दोन ओळी ज्या मला खूप आवडतात त्या सांगून मी माझे भाषण पूर्ण करतो.

ख्याईश नहीं मुझे मशहूर होने की,

आप मुझे पहेचानते हो.

बस इतना ही काफी है।

आपला

दगडू मथुरा बाबूराव लोमटे

अध्यक्ष, सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन, नेपाळ.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com