हरमनप्रीत कौरचा इंग्लंडविरुद्ध झंझावात, 'हा' खास विक्रम केला नावावर

हरमनप्रीत कौरचा इंग्लंडविरुद्ध झंझावात, 'हा' खास विक्रम केला नावावर

भारतीय महिला क्रिकेट संघ सलग दुसऱ्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. तब्बल 23 वर्षांनंतर इंग्लंडच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत ब्रिटीशांचा पराभव झाला आहे. तसेच, इंग्लंडमध्ये ही दुसऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौरने शानदार खेळी केली आहे.

भारतीय संघ सलग दुसऱ्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर आहे. मागील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी खेळवल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकले आहेत. यासह मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने 7 गडी राखून विजय मिळवला होता. तर बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाचा 88 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या खेळात चमक दाखवली आहे

हरमनप्रीत कौरने 111 चेंडूत नाबाद 143 धावांची शतकी खेळी केली. यादरम्यान तिने 4 षटकार आणि 18 चौकार मारले. हरमनचा स्ट्राइक रेट 128.83 होता. या सामन्यात हरमनप्रीत कौरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. हरमनच्या कारकिर्दीतील हे पाचवे वनडे शतक होते.

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. यामध्ये हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 5 गडी राखत 333 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यामध्ये हरलीन देओलने 58 धावांची शानदार खेळी केली. 334 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 44.2 षटकात 245 धावांतच गारद झाला. इंग्लंडच्या संघाकडून फक्त डॅनियल व्हाईटने 65 धावा केल्या. भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

याबरोबरच हरमनप्रीत कौरने वनडेतील पाचव्या शतकासह स्मृती मंधानाच्या वनडेतील पाच शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. हे दोन्ही फलंदाज आता महिला वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर भारतीय महिला संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com