भारतीय संघाचा पाकिस्तावर दणदणीत विजय, हॉकीमध्ये रचला इतिहास
नवी दिल्ली : ओमानमधील सलालाह येथे ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला आहे. या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय हॉकी संघ पाकिस्तानशी भिडला. गुरुवारी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर 2-1 असा दणदणीत विजय मिळवला.
हा सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. या विजयासह ज्युनियर हॉकी भारतीय संघ सर्वाधिक वेळा आशियाई विजेतेपद पटकावणारा संघ बनला आहे. यामध्ये भारतीय संघाने 3 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तानचा पराभव केला.
यंदाच्या संपूर्ण हंगामात भारतीय संघाने आपला उत्कृष्ट खेळ दाखवला. टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 9-1 असा पराभव केला. तर पाकिस्तानने उपांत्य फेरीत मलेशियाचा 6-2 असा पराभव केला. तर, अंतिम फेरीत भारत-पाकिस्तानचे संघ एकमेकांना भिडले. यावेळी भारताने पाकिस्तानचा पराभव करत 2-1 ने सामना आपल्या खिशात टाकला. उत्तम सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे.
दरम्यान, ज्युनियर आशिया चषकाचे आठ वर्षांनंतर आयोजन करण्यात आले होते. 2015 मध्ये मलेशियामध्ये शेवटची ही स्पर्धा खेवळण्यात आली होती. यंदा भारताने ज्युनियर आशिया चषकात चार सामने खेळले, त्यात तीन जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला. भारताच्या गटात पाकिस्तान, थायलंड, जपान आणि चायनीज तैपेई या संघांचा समावेश होता. भारताने गट सामन्यांमध्ये 39 गोल केले. एकूणच, भारताने या स्पर्धेत 50 गोल केले आहेत.