महाराष्ट्राच्या महिला संघाची कर्नाटकवर मात; खाे-खाे संघ पाचव्यांदा फायनलमध्ये

महाराष्ट्राच्या महिला संघाची कर्नाटकवर मात; खाे-खाे संघ पाचव्यांदा फायनलमध्ये

सलग पाचव्यांदा सुवर्णपदकापासून एका पावलावर

जबलपूर : जानकी पुरस्कार विजेती जान्हवी पेठे आणि नरेंद्रच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र खो-खो संघांनी पाचव्यांदा खेलो इंडिया युथ गेम्सच्या फायनलमध्ये धडक मारली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सलग चौथा विजय संपादन करत अंतिम फेरीचा पल्ला गाठला. यासह आता महाराष्ट्राचे संघ पाचव्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहे. महाराष्ट्र महिला संघाने उपांत्य सामन्यात कर्नाटकचा १ डाव आणि १ गुणांनी पराभव केला. तसेच महाराष्ट्र पुरुष संघाने उपांत्य लढतीत अवघ्या ६ गुणांनी ओडिसाचा पराभव केला.

राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, अश्विनी शिंदे, दीपाली राठोड यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्र महिला खो-खो संघाला पाचव्या सत्राच्या खेलो इंडिया युथ गेम्सची फायनल गाठून दिली. चार वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र महिला संघाने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्र महिला संघाने गुरुवारी उपांत्य सामन्यात कर्नाटकला डावाने धूळ चारली. जान्हवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाने १ डाव आणि १ गुणाने सामना जिंकला. यासह टीमला किताबावरचे आपले वर्चस्व राखून ठेवण्याची संधी आहे. आता सलग पाचव्या किताबापासून महाराष्ट्र महिला संघ अवघ्या एका पावलावर आहे.

उस्मानाबादची अश्विनी शिंदे, सोलापूरच्या प्रीती आणि दीपालीने सर्वोत्कृष्ट खेळी करत महाराष्ट्र संघाचा विजय निश्चित केला. यादरम्यान दीपालीने १.२० मिनिटे संरक्षण केले. तसेच अश्विनी शिंदेने २.४० मिनिटे पळती करत प्रतिस्पर्धी कर्नाटक टीमच्या खेळाडूंची दमछाक केली. तसेच प्रीति काळेने २. ४० मिनिटे पळती केेली.

महाराष्ट्र महिला संघाचा पाचव्या किताबाचा दावा मजबूत : कोच साप्ते

यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाची आगेकुच लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे आता संघाला पाचव्या किताबासाठी माेठी संधी आहे. यासाठीचा दावाही संघाने मजबूत केला आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र महिला संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांनी संघावर कौतुकाचा वर्ष केला.

अशी रंगणार फायनल:

महाराष्ट्र पुरुष संघाचा अंतिम सामना दिल्ली संघाशी हाेणार आहे. तसेच महिला गटामध्ये महाराष्ट्र - ओडिसा यांच्यात फायनल रंगणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com