Shubhman Gill
Shubhman GillTeam Lokshahi

शुभमन गिलचा धमाका! दुहेरी शतक ठोकत रचला इतिहास

स्टार फलंदाज शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या हैदराबाद वनडेत नवा इतिहास रचला आहे.

नवी दिल्ली : स्टार फलंदाज शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या हैदराबाद वनडेत नवा इतिहास रचला आहे. शुभमन गिलने धमाकेदार द्विशतक पूर्ण केले. शुभमनने 149 बॉलमध्ये 208 धावांची दमदार खेळी केली. गिलने 49व्या षटकात लागोपाठ तीन षटकार मारून दुहेरी शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीमुळे भारताने आठ गडी गमावून 349 धावांची मोठी मजल मारली आहे.

शुभमन गिलने या विक्रमी खेळीत अनेक विक्रम मोडीत काढले. गिल आता एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. गिलने ईशान किशनला मागे सोडले. इशान किशनने सहा आठवड्यांपूर्वी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा जगातील आठवा आणि भारतातील पाचवा फलंदाज आहे. गिलच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ईशान किशन या भारतीय खेळाडूंनी हा पराक्रम केला होता. याशिवाय फखर जमान, मार्टिन गप्टिल आणि ख्रिस गेल यांनी विदेशी फलंदाजांमध्ये हे स्थान मिळवले आहे.

तसेच, शुभमन गिल हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. असे करून गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. गिलने 19 व्या सामन्यात हा विक्रम केला. तर कोहलीने कारकिर्दीतील 24 व्या वनडेत 1000 धावा पूर्ण केल्या. वनडेमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या फखर जमानच्या नावावर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com