शिव-उपासना महायज्ञात 121 पती- पत्नींचा सहभाग
मुंबई : श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठात १२१ पती-पत्नींनी 31 जुलै रोजी सामुदायिक शिव-उपासना महायज्ञात सक्रिय सहभाग नोंदवला. यात गरीब-श्रीमंत, बुद्धीजीवी-श्रमजीवी, स्त्री-पुरूष सर्व भेद विसरून केवळ महाराजांच्या श्रद्धेपोटी व प्रेमापोटी सर्व भक्तगण एकत्र येऊन मोठ्या संख्येने शिवउपासना महायज्ञात सहभागी झाले. अशा उपक्रमातून समाजातील सर्व भेद नाहीसे होऊन प्रत्येकाच्या अहंकाराचे विसर्जन व्हावे हेच श्री सद्गुरू शंकर महाराजांना अपेक्षित आहे.
फुलांनी सजवलेल्या मंडपात भव्य स्टेजवर मोठे यज्ञकुंड तयार करण्यात आले होते. रुद्रमंडल, ग्रहमंडल तसेच सर्व देवी-देवतांची या ठिकाणी स्थापना करण्यात येऊन मध्यभागी महाराजांच्या फोटोची सुरेख सजावट करून स्थापना करण्यात आली. शिवपिंडीवर सर्व विश्वस्तांच्या हस्ते पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. सहभागी असणाऱ्या प्रत्येक जोडप्यास एक शिवलिंग ट्रस्टतर्फे भेट देण्यात आले. यावेळी एकवीस घनपाठीं आचार्यांनी एकाच लयीत व सूरात रूद्रपठण केले व सर्व वातावरण एका अलौकिक कंपनांनी भारावून गेले. मंत्रवेदांच्या उद्घोषाने मठाचा सर्व परिसर दुमदुमून गेला
प्रत्येकालाच पुजेत व हवनात प्रत्यक्ष व सक्रिय सहभाग मिळाल्याने एक प्रकारच आत्मिक समाधान झाले. एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सर्व भक्तांनी कोणतीही गडबड-गोंधळ न होता शिस्तीत, शांततेत पुजा व श्रवणाचा लाभ घेतला. ट्रस्टतर्फे सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
श्री स्वामी समर्थांचा नाम जप करीत केळीच्या पानावर शुद्ध सात्विक भोजनाचा भक्तांनी लाभ घेतला. शिस्तीत व शांततेत कार्यक्रम पार पाडल्याबद्दल सर्व विश्वस्तांनी कर्मचारी, सेवेकरी तसेच भाविकांचे आभार मानले. यावेळी सुरेंद्र वाईकर (अध्यक्ष), सतीश कोकाटे (सचिव), डॉ. पी. डी. पाटील, डॉ. मिहीर कुलकर्णी, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले आदी विश्वस्त मंडळ उपस्थित होते.