Devendra Fadnavis : महाराष्ट्र, तेलंगणा सीमाभागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार; 14 गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
(Devendra Fadnavis ) महाराष्ट्र व तेलंगणा सीमाभागातील दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या 14 गावांच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघणार आहे. या गावांचा समावेश थेट महाराष्ट्रात करण्यात यावा, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व जिवती तालुक्यांतील स्थानिकांचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सीमाभागातील विकास, स्थानिकांची मागणी आणि प्रशासकीय अडचणींचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी या 14 गावांचा चंद्रपूर जिल्ह्यात समावेश करण्यासाठी तात्काळ आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ही गावे सध्या तेलंगणाच्या सीमेजवळ असून नागरिक अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणी करत होते. शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक विकासाच्या दृष्टीने मोठा बदल घडून येण्याची शक्यता असून प्रशासकीय सुसूत्रता आणि सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे