Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 33 किलो हायड्रो गांजा जप्त, आठ जण अटकेत
( Mumbai Airport ) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांत सीमाशुल्क विभागाने एका पाठोपाठ एक अशा सहा वेगवेगळ्या कारवायांमध्ये हायड्रोपोनिक गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघडकीस आणली आहे. एकूण 33 किलो हायड्रो गांजा जप्त करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे किंमत 33 कोटी रुपये आहे. या तस्करीप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, तस्करांनी थायलंडमधील बँकॉक आणि मलेशिया येथून अंमली पदार्थ भारतात आणण्याचा प्रयत्न केला. हे पदार्थ प्रवाशांनी त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये लपवले होते. विमानतळावरील तपासणीदरम्यान अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने हे अंमली पदार्थ शोधण्यात यश आले. तपास यंत्रणांनी आठही आरोपींवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी विविध तपास यंत्रणांचा समन्वय सुरू आहे.
गेल्या काही काळात हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केलेल्या गांजाची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे आढळून आले आहे. ही गांजाची झाडं मातीविना, विशेष पोषक द्रावणात वाढवली जातात. वातानुकूलित जागांमध्ये एलईडी वा एचपीएस दिव्यांखाली नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेमध्ये ही शेती केली जाते. यामुळे झाडांचे उत्पादन जलद होते.