पाळीव कुत्रीचा वाढदिवस; तब्बल 75 मित्रांनी केले रक्तदान
अभिजीत हिरे | राजकिय प्रतिष्ठीत व्यक्ती असो अथवा एखाद्या महापूरूषाची जयंती असो, यानिमित्त आपण रक्तदान शिबिराचे (Blood Donate Camp) आयोजन केल्याचे पाहिलेच असेल. मात्र या घटनेत असे काहीच घडले असून एका कुत्रीच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 75 मित्रांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे या रक्तदान शिबिराची (Blood Donate Camp) आता एकच चर्चा रंगली आहे.
भिवंडी शहरातील ज्ञानराजा जनकल्याण संस्था आणि मी भिवंडीकर संकल्प रक्तदानाचा यांच्या संयुक्त संकल्पनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. भिवंडीतील मोहन पठाडे हे गेल्या तीन वर्षांपासून पाग जातीचा डॉगचे पालन-पोषण करतात. 'पोट्स'ला तीन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मैत्रणीने गिफ्ट स्वरूपात दिले होते. तेव्हापासून जीवापाड प्रेम करत घराच्या सदस्यासारखी त्या श्वानाची देखभाल करतात. 'पोट्स'च्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहन पठाडे यांनी भिवंडीतील पार्वती मंगल कार्यलयात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले होते. त्यात 'पोट्स'चे प्रेम करणाऱ्या बहुतांश तरुणांनी त्याला आशीर्वाद देऊन रक्तदान केले आहे.
'पोट्स' तीन वर्षाचा झाल्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी खास कार्यक्रमही साजरा करण्यात आला. यामध्ये 'पोट्स'चे औक्षण करून ओवाळण्यात आले, आणि घरच्या सदस्यांसह कॉग्रेसचे नगरसवेक प्रशांत लाड, साई संस्थांच्या डॉ. स्वाती खान यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा केला. 'पोट्स'च्या अशा अनोख्या वाढदिवसाची चर्चा भिवंडी शहरात पसरली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या वाढ दिवसामध्ये लॉकडाऊन होता. त्यावेळी गरीब गरजूना अन्नधान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.