जुई जाधव | मुंबई : अनेकदा मेडीकल दुकानदार डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनऐवजी दुसरी गोळी देतात. व आपणही डॉक्टरांना न दाखवता ती गोळी घेतो. परंतु, एक चूक आपल्या किंवा प्रियजनांच्या जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे.
कपिल पठारे नामक व्यक्तीच्या मुलीला 104 इतका ताप होता. त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले व डॉक्टरांनी तिला औषध लिहून दिली होती. ते प्रिस्क्रीप्शन घेऊन कपिल पठारे के.एम. हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या वेलनेस फॉरएव्हर या मेडिकल शॉपमध्ये गेले. परंतु, प्रिस्क्रीप्शनमध्ये लिहिलेलं औषध आणि तेथील कामगाराने दिलेलं औषध दोन्हीही वेगवेगळं होतं. ते औषध पठारे यांनी मुलीला दिल्यानंतर तिला ग्लानी आली.
सुरुवातीला औषधांचा परिणाम असावा असं तिच्या घरच्यांना वाटलं. मात्र ती मुलगी बेशुध्द पडली होती. डॉक्टरांना औषध दाखवल्यानंतर समजलं की दिलेला औषध हे प्रिस्क्रीप्शनमधील औषधापेक्षा वेगळा आहे. मेडिकल स्टोअरमध्ये गेल्यानंतर त्या माणसांनी ही छोटीशी चूक असल्याचे म्हणत त्याच्यामध्ये एवढं काही नाही असं सांगितलं. याविरोधात पोलीस तक्रार करण्याचा निर्णय कपिल पठारे यांनी घेतला आहे.