राज्यात संमिश्र वातावरण; 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तर कुठे उष्णतेची लाट
मुंबई : जूनचा महिना संपत आला तरीही मान्सून अद्यापही हजेरी लावली नाही. याउलट उन्हाचा तडाका सुरूच असल्यामुळे पाणीटंचाईची समस्या कायम आहे. शेतकरी आणि नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच, पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. सोबतच, काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागच्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात संमिश्र हवामान राहणार आहे. यासोबतच, हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्यात आवाहनही केले आहे.
तर, पुढील तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे मुंबई, पुणे, मराठवाडा आणि महाराष्ट्राचा उर्वरीत भाग व्यापणार आहे. तसेच २३ जूनपासून नैऋत्य मोसमी वारे सक्रीय होतील, अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.